फुलवळ सर्कल -विद्यासागर वाघमारे
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. कृपया एकही झाड तोडू नका. कारण झाडे आपणास ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन पाहिजे असेल तर अधिकाधिक झाडे लावणे हे अंत्यत गरजेचे आहे. असे प्रतिपादन लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
श्री संत नामदेव महाराज व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर यांच्या सुवर्ण कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त दहा हजार वृक्षलागवडीचा शुभारंभशुक्रवारी, दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता श्री संत नामदेव महाराज संस्थान, उमरज ता. कंधार येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री संत नामदेव महाराज संस्थानचे
मठाधिपती महंत एकनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे संतोष कुलकर्णी, माजी जि.प. सभापती प्रविण पाटील चिखलीकर, माजी जि.प. सदस्य अॅड. विजय धोंडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबुराव केंद्रे, लोहा पं.स.चे माजी सभापती आनंदराव ढाकणीकर, नगराध्यक्ष शहाजी नळगे, लोहा न.प.चे नगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक स्वप्निल लुंगारे, रवि कस्ट्रक्शनचे सुर्यकांत गुट्टे, वनरक्षक शिवसाब घोडके, वनपाल देवराव
घुगे, माजी सैनिक विकास समितीचे तालुकाध्यक्ष बालाजी चुकलवाड, ब्रह्माकुमारीज उपसेवाकेंद्राच्या संचालिका ज्योती बहनजी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीधर विश्वासराव, उमरजचे सरपंच प्रतिनिधी विष्णू केंद्रे, चेअरमन मोतीराम तोरणे, मधुकर डांगे, सुर्यकांत पैनापल्ले, नवनाथ आईतवाड, नवनाथ तोरणे, सचिन पेठकर, सतिश नळगे, ज्ञानोबा गिते, माधव कल्हाळे, बालाजी तोरणे, विलास सांगवे, ज्ञानेश्वर तेलंग,
लक्ष्मण भुत्ते, शिवाजी भुत्ते आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मठाधिपती एकनाथ महाराज म्हणाले, यावर्षी उमरजच्या श्री संत नामदेव महाराज संस्थानने दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. आता संस्थान परिसरात काही झाडे लावलेली असून, पावसाळ्यात अधिक झडे लावली जातील. विशेषतः उमरज पाटी ते उमरज रस्त्याच्या दुतर्फा विविध झाडे लावली जातील. झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. झाडे आपणास विनामूल्य ऑक्सिजन देतात. यामुळे झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. भाविक, भक्तांनी श्री संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येताना नारळ, अगरबत्ती, प्रसाद न आणता कोणतेही एक रोप घेऊन यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
