प्रतिनिधी / स्वाती हडकर
भारतीय सेनेचा महत्त्वाचा घटक असलेल्या Corps of Signals ची स्थापना १५ फेब्रुवारी १९११ रोजी झाली. त्यानिमित्त २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ११५ वा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून सिग्नल्स परिवारातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात उतेखोल येथील वाकडाई देवी मंदिराजवळील विक्टोरिया क्रॉस विजेते वीर नायक यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली.
द्वितीय महायुद्धात शौर्य गाजविणाऱ्या या वीराला उपस्थितांनी मानवंदना दिली.
यानंतर रिक्रलाईन रिसॉर्ट येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. दिवंगत हवालदार वसंत अर्जुन पवार यांच्या धर्मपत्नी श्रीमती नंदिनी वसंत पवार यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
तसेच ८० वर्षांवरील ज्येष्ठ माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष हवालदार वसंत रामचंद्र धामणे (सेवानिवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती.
माणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होते.
महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
देशभक्तीपर गीतांनी आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभेदार योगेश बने यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभेदार अमोल पिसाळ यांनी केले. अध्यक्षीय भाषणात हवालदार धामणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत हा सोहळा साजरा होणे अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. सन २०२७ चा पुढील स्थापना दिवस कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
