अमरावती (प्रतिनिधी )- संजय सरवटकर
अमरावती
अंजनगाव सुर्जी ते अकोट या दोन शहरांना जोडणारा मुख्य मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग १६१ए (NH 161A) चा भाग असून तो पुढे अकोला मार्गे जातो. महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ चा हा दुय्यम मार्ग मानला जातो. याच महामार्गावरील भंडाराज (ता.अंजनगाव सुर्जी) येथे होली क्रॉस दवाखान्याजवळील छोट्या पुलासमोरील धोकादायक वळणावर भीषण अपघात घडला.
मारुती सुझुकी स्विफ्ट (क्रमांक MH 27 BE 8081) व एसटी बस (क्रमांक MS 20 GC 3932) यांच्यात समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मृत व्यक्तीचे नाव शालिकराम रामचंद्र वानरे (वय ६५, रा. आकोट) असे असून ते स्वतः वाहन चालवत होते. घटनास्थळी रस्ता दबलेला असून मोठा गड्डा पडलेला आहे. या गड्ड्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून कार सुमारे ३० ते ४० फूट घासत पुढे गेली आणि समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की शालिकराम वानरे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कुसुम वानरे (वय ६५, रा. आकोट) व रखमाबाई शालिग्राम गवई (वय ८०, रा. अकोला) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी अचलपूर येथे रेफर करण्यात आले आहे. तसेच विमल रमेश पिंपळकर (वय ५५), वंदना निलेश पिंपळकर (वय ३५), रमेश रामचंद्र पिंपळकर (वय ७२) – सर्व रा. अचलपूर, तसेच उत्कर्ष कडू वानरे (नववधू, रा. आकोट) व प्रथमेश वानरे (वय ३०, रा. आकोट – नवविवाहित वर) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना अकोट व अचलपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदर कुटुुंब मुरा देवी (ता. अंजनगाव सुर्जी) येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. नवविवाहित दाम्पत्याच्या प्रवासातच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भंडाराज येथील याच वळणावर यापूर्वीही वारंवार अपघात झाले आहेत. रस्त्यावरील मोठा गड्डा, दबलेला भाग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करून इशारा फलक, वेगमर्यादा चिन्हे व संरक्षक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुढील तपास अंजनगाव सुर्जी येथील पोलीस तपास करीत आहेत.

