ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक दावा…
विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे.
ठाकरे गटाला भगदाड पाडण्यासाठी शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. या ऑपरेशन टायगरमध्ये शिंदे गटाकडून आमदार, खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे पक्ष सोडावा यासाठी पैशांची ऑफर देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या खासदाराने केला आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजपकडून करण्यात येत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या भरवशावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केले. ऑपरेशन टायगरनुसार, शिंदे गटात ठाकरेंच्या माजी लोकप्रतिनिधींचा पक्षात प्रवेश सुरू होता. तर, दुसरीकडे खासदारही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खासदार देशमुखांनी काय म्हटले ?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू आहे. पक्ष फोडण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केला. राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. पक्ष संघटना मोठी केली. परंतु शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत आहे. पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला. वणी येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. वणी मतदार संघात महिलांनी आमदार संजय देरकर यांना साथ दिली. अशीच एकजूट ठेवण्याचे आवाहन खासदार देशमुख यांनी केले.
उद्धव ठाकरे घेणार आमदार-खासदारांची बैठक…
ऑपरेशन टायगरमुळे पक्षाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार सहभागी होतील. तर खासदारांची 25 फेब्रवारीला बैठक बोलवली आहे. मुंबईत मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील होणारी पडझड रोखण्यासाठी ठाकरे गटाची आमदार आणि खासदारांसोबत संवाद मोहीम सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
