
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना – शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांना ताबडतोब अटक करून राजद्रोहाचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन करण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांची बुधवार दि. 19 रोजी दुपारी 2 वाजता मा. खा. भाऊसाहेब देशमुख सभागृह भाग्यनगर येथे बैठक घेवून करण्यात आला असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. बैठकीच्या सुरवातीस इतिहासतज्ञ मा. म. देशमुख यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
सदरील बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले त्यामध्ये शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून, राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत.
शिवद्रोह्यांना राज्यसरकार जी ममत्वाची वागणूक देत आहे आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही गुन्हेगारासम कठोर कारवाई करत उचलून आणून अटक करत नाही, तसेच त्यांच्या पाठीमागील मास्टरमाईंडचा शोध घेत नाही किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही ही वस्तुस्थिती आहे ! याच प्रवृत्तींनी अश्याच प्रकारे यापूर्वीसुध्दा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात सुध्दा असंस्कृत, विकृत, घाणेरडी विधाने केली होती परंतु राज्यसरकारने बोटचेपी भुमिका घेतल्यामुळे अश्या राष्ट्रद्रोही शक्तीचे मनोबल वाढले आहे म्हणून या गुन्हेगारावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करून इतरांना जरब बसवावी.
औरंगजेबाच्या कबरी वरून राज्य प्रमुख आणि राज्यकर्ते जी बेजबाबदार प्रक्षोभक विधाने करत आहेत; मराठ्यांच्या व रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या अत्यूच्च शौर्याचे निशाणी उखडून टाकण्याचे जे षडयंत्र रचले जात आहे ते मराठ्यांचा सर्वश्रेष्ठ इतिहास मिटवण्याचे हिंदुत्वी व पेशवाई शक्तीचे कारस्थान असून हे मराठा इतिहासावर जबरदस्तीचे सांस्कृतिक व ऐतिहासिक आक्रमणच आहे!
मा. मुख्यमंत्री व राज्याच्या माहितीसाठी 2023 /24 साली केंद्र सरकारने भारतिय पुरातत्व विभाग (एएसआय) आणि निती आयोगाच्या शिफारशीनुसार देशातील 18 पुरातत्व स्थाने वगळली आहेत आणि त्यासाठी एएसआय चा कायदा प्राचीन संस्मारक तथा पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष अधिनियम 1958 मधील कलम 35 अन्वये राज्याच्या शिफारशी नुसार केंद्राला एएसआय स्थळांच्या यादीतील स्थळे वगळण्याचा अधिकार आहे. आणि जर सध्याच्या राज्यकर्त्यांना मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिके मिटवावीत असे वाटत असेल तर मा फडणवीस आणि मा मोदी सरकारने औरंगजेबाची कबर कायदेशीररित्या एफएसआय च्या संरक्षणातून वगळावी आणि तसे आदेश निर्गमित करावेत पण नाहक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, सामाजिक सौहार्द संपेल आणि गल्लीगल्लीत दंगे होतील अशी बेजबाबदार वातावरण निर्मिती करू नये.
लक्ष्मण ऊत्तेकराने छावा मधे सुनियोजित विकृतीकरण केले आहे ते त्यांनी टाळायला हवे होते. शिर्के घराण्यांचा खोटा इतिहास दाखवला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर मृत्यू ला कारणीभूत असलेल्या सल्लागार वर्गाचा सहभाग लपविला आहे / वगळला आहे म्हणून राज्याच्या प्रमुखांनी सिनेमा ची कथा म्हणजे ईतिहास नाही याचे भान ठेवून वक्तव्य करावीत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर मृत्यू ला औरंगजेब सह कुठल्या तत्कालीन धार्मिक शक्ती व सल्लागार जबाबदार आहेत त्याचेही सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली होती याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत आणि त्यांनी औरंगजेब कन्येच्या स्मरणार्थ साता-यात ’बेगम मशिद’ उभारली होती जी आजही आहे याचा विसर पडू देऊ नये! तसेच राजमाता जिजाऊ साहेब यांच्या सुचनेनुसार प्रतापगड च्या पायथ्याला अफजलखानाची कंबर उभारून ’मरणांती वैराणी… या भारतीय संस्कृतीचा धडा घालून दिला आहे याचेही भान छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानत असतील तर सांप्रतकालीन राज्यकर्ते यांनी ठेवले पाहिजे.
सर्वसत्ताधीश मुघल बादशहा औरंगजेब याला झुंजवत झुंजवत याच महाराष्ट्र भुमित गाडला आणि मुघल सल्तनत खिळखिळी करून टाकली अश्या मुघलमर्दिनी रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचे भव्य अश्वारूढ स्मारके मुंबईत मंत्रालयासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऊभे करावेत आणि त्यांचा फोटो मंत्रालय प्रवेशद्वार ते सर्व शासकीय कार्यालयात तातडीने लावावेत तसेच शालेय, महाविद्यालय, संशोधन अभ्यासक्रमात रणरागिणी ताराराणी चा शौर्याचा इतिहास समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यातून तरूण पिढीला प्रेरणा मिळेल.
रणरागिणी छत्रपती ताराराणी व छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे साता-यातील समाधीस्थळ उचित दर्जाचे बांधकाम करून शासकीय इतमामात पुजा दिवाबत्ती करणेचा निर्णय तातडीने करावा. नसता मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र आणि शिवप्रेमी संघटना ’स्वराज्यसेवा’ म्हणून श्रम’धन’दान करून ही दर्जेदार समाधीस्थळे उभारतील! महाराष्ट्र द्रोही बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मारकासाठी राज्यसरकार शेकडो करोड रू. देत आहे/दिले आहेत पण मुघलमर्दिनी रणरागिणी ताराराणी व छत्रपती शाहू महाराज थोरले याच्या स्मारकाची दुरवस्था सहनशक्ती च्या पलिकडे गेली आहे याची गंभीर नोंद घ्यावी.
दिल्लीच्या तालकटोरा येथे मराठा विर पेशवा बाजीराव पहिला, श्रीमंत महादजी शिंदे, श्रीमंत मल्हारराव होळकर यांची स्मारके ऊभा करण्यासाठी ना. एकनाथराव शिंदे आणि मा. शरदचंद्रजी पवार यांनी सुचना केली आहे ती स्वागतार्ह आहे. परंतु त्यातून तत्कालीन छत्रपती शंभुपुत्र शाहू महाराज यांना वगळले जाते आहे हे अनाकलनीय असून मराठा इतिहासाची मोडतोड तर केली जात नाही ना? ताल कटोरा येथे छत्रपती शंभू पुत्र शाहू महाराज यांचाही छत्रपतीच्या इतमामामला साजेसे स्मारक ऊभे केलेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे.
आरेस्सेस प्रमुख मोहन भागवत आणि सावरकर स्मारक चे रणजित सावरकर यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांनी त्यांच्या विचारांच्या साहित्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवशाही, स्वराज्य यासंदर्भात जे अनैतिहासिक, बेजबाबदार, बदनामीकारक लिखाण समाविष्ट आहे व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले आहे/केले जात आहे आणि शौर्या ऐवजी असाच मजकूर इंटरनेट महाजाळातून जगभर जात आहे आणि या युगप्रवर्तक महापुरुषांची बदनामी होत आहे तरी तातडीने हा असा मजकूराचा भाग वगळण्यात यावा आणि पुढील आवृत्तीत समाविष्ट करू नये. नसता कायदेशीर, न्यायालयीन कारवाई केली जाईल.
या सर्व मागण्याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा तसेच शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांना ताबडतोब अटक करून राजद्रोहाचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे! आणि यासाठी शुक्रवार दि. 21 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहेत.
यावेळी डॉ. संजय लाखे पाटील, संतोष गाजरे, सुभाष कोळकर, अशोक पडूळ, जगन्नाथ काकडे, राजेंद्र गोरे, अरविंद देशमुख, संदीप ताडगे, काकासाहेब खरात, राम देठे, रवी वाडेकर, नरसिंग पवार, ज्ञानेश्वर माऊली ताकट, संजय देशमुख आदींची उपस्थिती होती.