
केंद्राने दिली ७ हजार कोटींच्या स्वदेशी तोफ खरेदीला मंजुरी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) ७ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारास मंजुरी दिली. या कराराअंतर्गत ॲडव्हान्स्ड टोइड आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS) खरेदी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे ही भारतातच डिझाइन आणि विकसित केलेली पहिली स्वदेशी आर्टिलरी गन आहे. सरकारच्या मते, हा करार आर्टिलरी गन उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. १५५ मिमी लांबीच्या या अत्याधुनिक तोफांमुळे भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
ATAGS ची वैशिष्ट्ये आणि सामर्थ्य
ॲडव्हान्स्ड टोइड आर्टिलरी गन सिस्टम प्रणालीमध्ये ५२-कॅलिबरची लांब तोफ आहे, जी ४० किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. या प्रणालीमुळे उच्च मारकता प्राप्त होते आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक भार वाहून नेण्याची क्षमता मिळते. शिवाय, स्वयंचलित तैनाती, लक्ष्य भेदण्याची क्षमता आणि कमी क्रू यामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी ठरते.
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मोठी उपलब्धी
ॲडव्हान्स्ड टोइड आर्टिलरी गन सिस्टम प्रणाली संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि भारतीय खासगी क्षेत्रातील भागीदारांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यातील ६५ टक्केहून अधिक भाग भारतातच तयार केले जातात. यामध्ये बॅरल, मझल ब्रेक, ब्रीच मेकॅनिझम, फायरिंग व रेकॉइल सिस्टीम आणि दारुगोळा हाताळणी यंत्रणा यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि परदेशी उपकरणांवरील अवलंबित्व कमी होईल.
भारतीय लष्कराच्या तोफखान्याचे आधुनिकीकरण
ॲडव्हान्स्ड टोइड आर्टिलरी गन सिस्टम प्रणालीमुळे भारतीय लष्कराच्या जुन्या १०५ मिमी आणि १३० मिमी तोफा बदलण्यास मदत होईल. विशेषतः पश्चिम आणि उत्तरी सीमेवर या तोफा तैनात केल्याने लष्कराला सामरिक फायदा मिळेल आणि युद्धसज्जता वाढेल.
स्वदेशी उत्पादनामुळे दीर्घकालीन लाभ
पूर्णतः स्वदेशी असलेल्या या प्रणालीला दीर्घकालीन तांत्रिक सहाय्य मिळेल आणि सुटे भाग सहज उपलब्ध होतील. यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता वाढेल. ॲडव्हान्स्ड टोइड आर्टिलरी गन सिस्टम साठी नेव्हिगेशन सिस्टम, मझल वेग रडार आणि सेन्सर्ससारख्या महत्त्वाच्या प्रणालीदेखील भारतातच विकसित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल.
रोजगार निर्मिती आणि संरक्षण निर्यातीस चालना
ॲडव्हान्स्ड टोइड आर्टिलरी गन सिस्टम निर्मितीमुळे सुमारे २० लाख रोजगार निर्माण होईल. तसेच, या योजनेमुळे भारताच्या संरक्षण निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे देशाला जागतिक संरक्षण बाजारपेठेत आपली क्षमता सिद्ध करता येईल.