
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी/ खेड-बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या कन्या भागीरथी माता मालोजी गाडे यांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र येलवाडी मध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गाथापारायण सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याची सांगता बुधवार ( ता.१९ ) रोजी वारकरी भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांना शेवयांचा महाप्रसाद देऊन करण्यात आली.
संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्या दिवशी संत तुकाराम महाराजांची कन्या संत भागीरथी माता यांनी आपले वडील कुठे गेले म्हणून धावा केला ..
बाबा गेले कोण्या गावा ।भागीरथी करी धावा ।म्हणून शिग्र आले । येलवाडी गावा । गुरुतिया पूजिले ।जेवणासी पात्र विस्तारीले ।येलेश्वरा जे पूजिले ।। या अभंगाच्या उक्ती प्रमाणे संत भागीरथी मातेचा धावा पाहून संत तुमाराम महाराज भागीरथी मातेच्या घरी आले.मग त्यांना दोन घास जेवण घालण्यासाठी शेवया बनवल्या परंतु त्यावर दूध हवे म्हणून भागीरथी माता धावत येलेश्वराच्या मंदिरात गेल्या ,आणि त्या ठिकाणी नंदीचे दूध काडुन ते शेवया बरोबर संत तुकाराम महाराजांना शेवया खायला घातल्या ,अशी आख्यायिका आहे.तेंव्हा पासून परंपरेनुसार रंग पंचमीच्या दिवशी संत तुकाराम महाराज आणि भागीरथी माता यांना शेवयांचा नैवंध्य दिला जातो आणि या शेवयांचा महाप्रसाद सर्व वारकरी भाविक भक्त ,आणि ग्रामस्थांना दिला जातो.खरी शांती संत संगतीने प्राप्त होते म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहात थोर महातम्यांची कीर्तनसेवा दिली जाते.त्यातच दररोज हरिनाम , गाथा पारायण , हरी नामाचा जागर ,भजनी मंडळांची भजन सेवाही दिली जाते.या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता .बुधवार ( ता.१९ ) रोजी देहूकर महाराज यांच्या किर्तनाने आणि शेवयांच्या महाप्रसदाचे वाटप करून करण्यात आली. संत भागीरथी माता देवस्थान संस्थान ,आणि समस्त तीर्थक्षेत्र येलवाडी ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते.
अखंड हरिनाम सप्ताह व रंगपंचमी सोहळ्या निमित्त ,संपूर्ण येलवाडी गागात घरोघरी आणि संपूर्ण येलवाडी गावातील रस्त्यावर आकर्षक आशा रांगोळ्या काडुन पायघड्या घालण्यात आल्या होत्या.डोईवर गाथा ,आणि तुळशी वृंदावन घेऊन पालखीची मिरवणूक काढण्यात आली.ज्ञानोबा ,तुकाराम आणि टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी येलवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन गेली होती.