
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर-लातूर महामार्गावर करडखेल पाटी येथे प्रवाशांसाठी बस थांबा असला तरी निवारा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी बस थांबते, मात्र प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कडक ऊन, पावसाळ्यात भिजण्याचा धोका आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे तातडीने बस थांब्यावर निवारा उभारण्यात यावा, तसेच CCTV कॅमेरे आणि पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी केली आहे.
—
बस थांबा असला तरी सुविधा नाहीत – प्रवाशांची गैरसोय
करडखेल पाटी हे हेर, जंगमवाडी, जायबाची वाडी, करवंदी, वायगाव, साताळा, कुंभारवाडी, करडखेल, भाकसखेडा आदी गावांना जोडणारे प्रमुख ठिकाण आहे. उदगीरपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाहून विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.
परंतु या ठिकाणी बस थांबतो, पण निवारा, बाके किंवा पथदिवे नसल्याने प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहावे लागते. संध्याकाळी सातनंतर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांची गर्दी वाढल्याने एस.टी. बस थांबत नाहीत, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
—
प्रवास सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे आणि पथदिव्यांची गरज
रात्रीच्या वेळी अंधार आणि असुरक्षितता यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले तर सुरक्षेचा प्रश्न सुटू शकतो. तसेच पथदिवे बसवल्यास रात्री प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
सरकार कर गोळा करते पण सुविधा देत नाही – विवेक जाधव
यासंदर्भात बोलताना युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव म्हणाले,
“विद्यार्थ्यांच्या पेन्सिलपासून ते शेतकऱ्यांच्या खतांपर्यंत सरकार GST च्या माध्यमातून कर गोळा करत आहे. मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. फक्त कर गोळा करून जाहिरातबाजी करण्यापेक्षा सरकारने जमीनस्तरावर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी, विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी करडखेल पाटी येथे निवारा असलेला बस थांबा, CCTV कॅमेरे आणि पथदिवे बसविणे गरजेचे आहे. प्रशासनाने झोपेतून उठून त्वरित कारवाई करावी.”
————————————–
प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी
करडखेल पाटी येथील प्रवाशांची दैनंदिन गैरसोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने बस थांब्यावर निवारा, CCTV आणि पथदिवे बसवण्याची मागणी योग्यच आहे. प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी आहे.
___________________________
बस थांब्याच्या सुविधांसाठी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक जाधव मैदानात!