भाजपमध्ये प्रवेश करणार…
एकेकाळी मालेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र बदलत्या परिस्थितीत सत्ताहीन झाल्यामुळे अनेकांनी काँग्रेसचा त्याग केला आहे. त्यामुळे आता एकेकाचा बालेकिल्ला काँग्रेस पक्षासाठी अस्तित्वहीन झाला आहे.
माजी मंत्री (कै.) डॉ. बळीराम हिरे यांचे चिरंजीव आणि एका मोठ्या शिक्षण संस्थेचे संचालक प्रसाद हिरे आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. भाजपच्या मुंबई कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.
गेले काही दिवस प्रसाद हिरे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा मालेगाव येथे घेतला होता. यावेळी काँग्रेस पक्षाविषयी असलेली सध्याची स्थिती आणि राजकारणाचा कल यासंदर्भात समर्थकांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. वेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा संकेत दिला होता.
आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रसाद हिरे हे मालेगावचे नेतृत्व केलेल्या हिरे घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. प्रसाद हिरे आणि प्रशांत हिरे या दोन कुटुंबांमध्ये भाऊबंदकी आणि राजकीय भितृष्ट राहिले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सतत एकमेकांच्या विरोधात राजकारण करीत आले होते.
प्रशांत हिरे सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. तर अद्वय हिरे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते आहेत. प्रसाद हिरे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघात सातत्याने राजकीय सूर गवसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. गेली पाच टर्म सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे निवडून आले आहेत.
2004 मध्ये प्रसाद हिरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर ते पुन्हा स्वगृही काँग्रेस पक्षात परतले होते. आता आज ते पुन्हा यू टर्न घेत भाजपवासी होत आहेत. प्रसाद हिरे भाजप पक्षात प्रवेश करीत असल्याने काँग्रेस पक्षाला मालेगाव शहर बरोबरच मालेगाव बाह्य मतदारसंघातही मोठा धक्का बसणार आहे.
मालेगाव शहरात माजी आमदार आसिफ शेख यांनी यापूर्वीच पक्ष सोडला आहे. जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांना लोकसभेत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वाश्रमीच्या बहुतांशी काँग्रेसने त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने मालेगाव मध्ये पक्षाला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
यासंदर्भात प्रसाद हिरे यांनी आपण काँग्रेस पक्षावर नाराज नाही. पक्ष सध्या सत्तेत नाही. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्याची कामे करण्यासाठी आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकंदरच सत्तेचे वारे पाहून हिरे यांनीही आपली वाटचाल बदलली आहे.
