
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला यश मिळाल्याने शरद पवार गटाचे अनेक आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दोन्ही पवार गट एकत्र येतील, असे संकेत देऊन या आमदारांना रोखण्याची खेळी शरद पवार यांनी रचली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे काही नेते हे शरद पवार यांच्या सोबत राहिले होते. पण विधानसभा निवडणुकीत केवळ दहा आमदारांवर शरद पवार गट सीमित राहिला. आणि अजित पवार गट सत्तेवर आला. त्यामुळे विरोधी पक्षात राहून काही साध्य होणार नाही, असे शरद पवार गटाचे आमदार उघडपणे बोलू लागले आहेत. तसेच त्यांनी शरद पवार यांना भेटून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या आमदारांनी सत्तेसोबत जाण्याचा तगादा लावला आहे त्यामुळे शरद पवार अस्वस्थ आहेत.
जुन्या-नव्या नेत्यांमधील वाद टोकाला
त्यातच शरद पवार गटात जुने आणि नवे नेते असे गट पडले आहेत. त्यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गुप्त भेटीगाठी झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पवार गटातील रोहीत पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जुने नेते अस्वस्थ आहेत. तर जुने नेत्यांचे भाजप आणि अजित पवार यांच्याशी साटेलोटे आहे, असा रोहित पवार यांच्यासह नव्या नेत्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे या नव्या जुन्याच्या भांडणात शरद पवार यांची कोंडी झाली आहे.
त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्ये करणे सध्या बंद केले आहे. शरद पवार गटाचे निम्म्याहून अधिक आमदार हे निधीसाठी अजित पवार यांना भेटत आहेत. त्यांनी आम्ही तुमच्या पक्षात येण्यास तयार आहोत, हे अजित पवार यांना सांगून टाकले आहे. केवळ आमदारच नाही काही खासदार ही अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे या बदललेल्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनी ही खेळी केली आहे. दोन पवार एकत्र येणार असतील तर आपण शांत बसलेले बरे, असा विचार अजित पवार यांच्याकडे झुकलेले आमदार आणि खासदार करतील, असे या संकेतामागचे कारण आहे. दुसरे पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर पक्षात फूट पडली तर अवघड स्थिती बनेल, यातून पवार यांनी हे विधान केले आहे.