
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसे झाल्यास जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णता बदलणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये युती न झाल्यास व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप व शिंदे गटाला ते परवडणारे नाही.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप व शिंदे गटासाठी साहजिकच डोईजड ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमळनेर विधानसभा मतदारसंघ वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद फारशी नव्हती. मात्र माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह दोन माजी आमदार व शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केल्याने आधीच शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आणखीच ताकद वाढेल या टेन्शनमध्ये आता शिंदे गट आहे.
जळगाव महापालिकेत 2018 मध्ये भाजप स्वतंत्रपणे लढले होते व वर्चस्व प्रस्थापित केले होते. तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. त्यानंतरच्या काळात शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून महापालिकेच्या सत्ता ताब्यात घेतली होती. आता आगामी निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढण्यास भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे चित्र राहील. त्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास जळगाव महापालिकेत भाजप व शिंदे गटाबरोबर वाटाघाटी करुन राष्ट्रवादी आपली ताकद आजमावू शकते.
दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रया येत आहेत. काल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत लवकर निर्णय घ्यावा असा सूर बैठकीत उमटला.
पक्ष एकत्रीकरणाबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य राहील असं सर्व नेते पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार एकनाथ खडसे, निरीक्षक भास्करराव काळे, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप खोडपे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून पक्ष बळकट करावी अशीही भूमिकाही घेतली.
सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट एकत्रित येणार असल्याचा केवळ चर्चा आहेत. राष्ट्रवादी एकीकरण होईल तेव्हा होईल पण वेगवेगळे लढल्यास शरद पवार गटासाठी ती अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे. सोमवारी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत एकजुटीने लढण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.