
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानला मोठा धडा शिकवण्याची हीच खरी संधी होती, असे मत विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागण्यास सुरुवात केली आहे. तर अमित शहा हे लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील, असा दावाच आता राऊतांनी केला आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदी आणि त्यानंतर आता भाजपाकडून काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेच्या मुद्द्यावर बोलत असताना राऊतांनी हा दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 15 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिरंगा यात्रेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले की, या लोकांना विजय कळतो का? 1971 साली आम्ही विजय जल्लोष पाहिला होता. 1971 साली आम्ही विजय यात्रा काढली होती, कारण आम्ही जिंकलो होतो. तेव्हा 92 हजार पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर गुढगे टेकले होते. त्यावेळी आम्ही रोमांचित झालो होतो. आता रोमांचित व्हावे असे काय झाले होते. स्वतंत्र व्हायला बलूचिस्तान तयार होता. फक्त त्यांना भारताची मदत हवी होती. हे लोक तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर द्यायची हिंमत यांच्यामध्ये नाही. चीनने 27 गावांची नावे बदलली आहेत. त्यामुळे आता मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शहांनी राजीनामा द्यावा, या लोकांना राजीनामा द्यावाच लागेल, असे म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा राजीनाम्याच्या मुद्द्यावरून मोदी-शहा यांना घेरले आहे.
तर, अमित शहा लवकरच देशाच्या राजकारणात बाजूला होतील, असा दावाही यावेळी राऊतांकडून करण्यात आला आहे. अमित शहा नेमके काय आहेत, हे माझ्या पुस्तकातून कळले. माझ्या पुस्तकातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तसेच शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. ते एखाद्या गटात कशा करता जातील? मूळ पक्ष त्यांच्याकडे तात्पुरता तो प्रवाह चालू आहे. हेही दिवस जातील मोदी-शहा गेले की खाली काय राहते यांचे? आणि मोदी शहांना जावेच लागेल. ते अमृत पिऊन आलेत का? युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना? असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
तसेच, संपूर्ण देश सोफिया कुरेशी यांना मानवंदना देत आहे. एक लढवय्या महिला आपल्या हवाई दलात आहे, त्या भारताचे नेतृत्व करत आहेत. कुरेशी यांच्याविरोधात विधान करणाऱ्या भाजपा नेता विजय शहा यांना ताबडतोब बरखास्त केले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे. इतकेच नाही तर त्यांची पक्षातूनच हकालपट्टी झाली पाहिजे. पण भाजपा त्यांची हकालपट्टी करणार नाही. विजय शहाला लाथ मारून हाकलून दिले पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.