
गुजरातमध्ये ईडीने एका वृत्तपत्राच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपासून त्यांची सतत चौकशी तसेच कार्यालयांचा तपास सुरू होता. त्यानंतर अखेर ईडीने ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह यांना ताब्यात घेतले.
या कारवाईवरून विरोधक भडकले असून लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देखील या कारवाईच्या निमित्ताने गुजरात सरकार तसेच केंद्र सरकारवर टीका केली आहे. दोन्ही नेतांनी लोकशाही धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे.
बाहुबली शाह यांचा मोठा भाऊ आणि गुजरात समाचारचे व्यवस्थापकीय संपादक श्रेयांश शाह यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस त्यांच्या कार्यालयांचा तपास केला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी ईडीचे अधिकारी त्यांचा छोटा भाऊ बाहुबली शाह यांच्या नावाचे अटक वॉरंट घेऊन आले, आणि त्यांना सोबत घेऊन गेले.
या प्रकरणावरूनच आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस नेता आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, गुजरात समाचार बंद करण्याचा हा प्रयत्न म्हणजे केवळ एकाच वर्तमानपत्राचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न नाही तर लोकशाहीचाच आवाज बंद करण्याचा कट आहे.
जेव्हा सत्तेतील लोकांना आरसा दाखवणाऱ्या वृत्तपत्रे बंद केली जातात, तेव्हाच समजून जावे की लोकशाही धोक्यात आली आहे. बाहुबली शाह यांची अटक ही याच भीतीतून झाली आहे. ही भीती हीच मोदी सरकारची ओळख बनली असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. देश लाठी-काठीने चालणार नाही आणि भीतीने देखील चालणार नाही. देश केवळ सत्य आणि संविधानावरच चालेल, असेही ते म्हणाले.
गुजरात समाचारवर होत असलेल्या कारवाईबाबत राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. त्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गेल्या 48 तासात गुजरात समाचार आणि गुजरात समाचार टीव्ही (GSTV) वर प्राप्तिकर विभाग आण ईडीने छापे टाकले. त्यानंतर त्याचे मालक बाहुबली शाह यांची अटक, हा योगायोग नाही. जे खरं बोलतात आणि प्रश्न विचारतात असा प्रत्येक आवाज दाबण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे केजरीवाल म्हणाले. देश तसेच गुजरातमधील जनता लवकरच या हुकूमशाहीला उत्तर देईल, असेही ते म्हणाले.