
भुजबळांचा तब्बल 33 वर्षांनी गौप्यस्फोट…
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आपली मतं,विचार परखडपणे मांडत असतात. ते कुठल्याही दबावाला न जुमानता रोखठोक भूमिकाही घेतात. अनेकदा त्यांच्या विधानं,भूमिकांवरुन मोठा गदारोळही उडतो.
पण तरी ते त्यावर ठाम असतात. आता त्यांनी शिवसेना सोडल्यावर तब्बल 33 वर्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या संबंधात निर्माण झालेल्या दरीमागचं कारण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीररित्या सांगून टाकलं आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ हे वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी अनेक गमतीशीर किस्सेही सांगितले. पण याचवेळी त्यांनी एकेकाळी कट्टर बाळासाहेब ठाकरे समर्थक असताना शिवसेना का सोडावी लागली यावरही भाष्य केलं.
भुजबळ म्हणाले,सगळ्या जाती त्यांच्या उद्योग धंद्यावरून पडल्या आहेत. पण आजपर्यंत जेव्हा जेव्हा ओबीसीला काही देण्याची वेळ आली किंवा ठरलं, तर हे कोर्टात जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील ओबीसी कमिटी स्थापन केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी आरक्षणाची मागणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भुजबळ म्हणाले,देशात जेव्हा जनता पार्टीचे सरकार आले,तेव्हा देसाई यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेताना थेट आयोग स्थापन करण्यास सांगितला. 1980 साली त्यांचा रिपोर्ट आला,त्यात ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज असल्याचं नमूद केलं होतं. पण काँग्रेसच्या काळात हा अहवाल दाबून ठेवण्यात आल्याचा आरोपही भुजबळांनी केला.
व्ही.पी.सिंग आल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा आयोगाचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर मी पण मग ओबीसी आरक्षणावर थेट बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी शिवसेनेत होतो. मात्र,तरीही आम्ही आरक्षणाचा आग्रह लावून धरला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नाशिकमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासह येत असतं. ते इथे राहतही होते, असंही भुजबळ म्हणाले.
ओबीसी आरक्षणाबाबतच्या मोर्चात असताना बाळासाहेब माझ्या घरी प्रेस घेत होते. पण याचदरम्यान,बाळासाहेब ठाकरेंनी ओबीसी आरक्षणाचा विषय हा विषय पुढे आणायचा नाही असं मला सांगितलं. आणि तिथूनच आम्हा दोघांमधील नात्यांमध्ये दरी निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी यावेळी वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलताना केला.
भुजबळ म्हणाले,ओबीसी आणि जातनिहाय जनगणना हे दोन मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, या सगळ्या ओबीसी, महिला,दलित,आदिवासी वर्गाला पहिली ओळख महात्मा फुले यांनी मिळून दिली. ब्राह्मण समाजातही फक्त पुरुषच शिकत होते, महिला शिकत नव्हत्या,अनेक गोष्टींचा ब्राह्मण महिलांना त्रास होत होता. त्याविरोधात फुले यांनी लढा देत,आंदोलन उभारल्याचा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी भाषणातून केला.