
अशोक चव्हाणांकडून उपमुख्यमंत्र्यांना क्लीनचीट; चिखलीकरांना टोला !
नांदेडच्या एका मटका किंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यावर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. मी अजित पवारांना दोष देत नाही.
स्थानिक नेतृत्वाने अजित पवारांना न सांगता प्रवेश देणे हे चुकीचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. कोणत्याही पक्षाने गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये, गुन्हेगारांना राजश्रय मिळून ते लोकांवर हावी होऊ लागले आहेत असे चव्हाण म्हणाले. अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाची कानऊघाडनी केली पाहिजे असे सांगत अशोक चव्हाण यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर निशाणा साधला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात अवैध धंदे, दोन नंबरचे धंदे करणारे पक्षात घेऊ नका. पक्षात चारित्र्यसंपन्न कार्यकर्ता घ्या असे अजित पवार सांगतात. मात्र त्यांच्या या वक्तव्याला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तिलांजली वाहिली आहे. आज नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर यांनी मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मटका किंग अशी ओळख असलेल्या अन्वर अली खानला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे.
बीडमध्ये राजकीय वरदहस्त असल्याने बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढवली होती. त्यानंतर अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर नांदेडमध्ये मात्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अजित पवार यांनी सांगितल्या गोष्टीचा विसर पडला की काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.