
महापालिकेची जोरदार तयारी…
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत असताना जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, तर दुसरीकडे महायुतीतील पक्षांत जागा वाटपाबाबत पडद्यामागे हालचाली सुरू आहेत.
तोमात्र, भाजप नेते गिरीश महाजन यांनी बैठका टाळत थेट कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवून वेगळीच रणनीती आखल्याचे चित्र दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात महायुतीकडे नेतृत्व गिरीश महाजन यांच्याकडे असून, खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर संपूर्ण सूत्रे त्यांच्या ताब्यात आली आहेत. जिल्हा परिषद व 17 नगरपालिकांमध्ये भाजपची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गिरीश महाजन प्रशासकीय बैठकींना अनुपस्थित राहत असले तरी भाजपच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. नाशिक किंवा जळगावचे पालकमंत्री पद त्यांच्या ताब्यात नसल्याने त्याचेही पडसाद त्यांच्या उपस्थितीत दिसत आहेत. जिल्ह्यातील राजकीय गणित लक्षात घेता ते स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल उपस्थित होतो आहे.
राजकीय समीकरणांतील बदल
जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून बाहेर पडल्यामुळे भाजपचे नेतृत्व महाजनांकडे आले. दुसरीकडे मंगेश चव्हाण यांनी जिल्हा बँकेतून खडसेंना थेट आव्हान देत आपली सत्ता निर्माण केली. शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभाव टाकत असून, आगामी निवडणुकांत त्यांची जबाबदारी वाढणार आहे.
मविआ पक्षांत विचलन, महायुतीत संभाव्य स्पर्धा
महाविकास आघाडीत फूट पडून अनेक नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. त्यामुळे आघाडीतील उरलेल्या नेत्यांवरच आगामी निवडणुकांची जबाबदारी येणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) यांच्यात जागा वाटपावर सामंजस्य होणार की स्वबळावर लढून नंतर सत्ता स्थापन केली जाईल, हे पाहावे लागेल.
नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत जोरदार चुरस
जळगाव महापालिका, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर या महत्त्वाच्या ठिकाणी भाजपचा प्रभाव आहे. अमोल जावळे यांना रावेर, सावदा, फैजपूर, यावल येथे भाजपसाठी सत्ता मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या रावेरमध्ये जनक्रांती आघाडी, सावदामध्ये भाजप, फैजपूरमध्ये भाजप आणि यावलमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत.
रावेर लोकसभा क्षेत्रात भाजपला जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. जळगाव लोकसभा क्षेत्रात मात्र भाजपला शिवसेनेच्या मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस व जनक्रांती आघाडीचा मुकाबला करावा लागणार आहे, तर दुसरीकडे महायुतीत सामंजस्य साधावे लागणार आहे.