
ज्यांनी ‘गोकुळ’ उभं केलं, त्यांचाच मुलगा अध्यक्षपदी !
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास अरुण डोंगळे यांनी नकार दिल्यानंतर मागचा संपूर्ण आठवडा नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या.
पण अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दटावल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला. डोंगळेंनंतर आता अध्यक्षपदासाठी गोकुळ उभे करणाऱ्या आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवला. घराघरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदवण्याचे काम या दूध संघाने केले. याच गोकुळची स्थापना 1963 साली एन.टी. सरनाईक यांच्या माध्यमातून आनंदराव पाटील-चुयेकर यांनी केली. आता त्यांचेच चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाला आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि आमदार डॉ. विनय कोरे यांच्या बैठकीनंतर या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
शशिकांत पाटील चुयेकर यांनी आतापर्यंत चुये गावचे सरपंच, बिद्री साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी संघाचे संचालक, गोकुळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याशिवाय श्रीराम दूध संस्था, हरहर महादेव पाणीपुरवठा संस्थांमध्येही त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. 2021 सालच्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यापूर्वी त्यांच्या आई दिवंगत जयश्री पाटील-चुयेकर या संचालक होत्या. त्यानंतर शशिकांत पाटील-चुयेकर अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत.
पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक नेत्यांना अध्यक्ष आपल्या मर्जीतीलच हवा, तो वरचढ नको असे वाटत आहे. हीच भूमिका घेत अध्यक्षपदासाठी आजपर्यंत राजकारण होत आलं. ही रणनीतीही चुयेकर यांना मान्यता देताना आखल्याचे बोलले जाते. शिवाय सर्वमान्य चेहरा आणि महायुतीचा कोणीही अध्यक्ष करा, या भूमिकेवर डोंगळे ठाम होते. त्यातून संस्थापकांचाच मुलगा म्हणून शशिकांत पाटील -चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात चुयेकर हे आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सर्वमान्य चेहरा म्हणून त्याचे नाव पुढे आले असले तरी ते अध्यक्ष झाले, तरी आमदार पाटील यांचा अध्यक्ष झाला, असे संदेश जिल्ह्याच्या राजकारणात जाणार आहे. पण, आमदार चंद्रदीप नरके, संचालक अमरसिंह पाटील यांचे ते नातेवाईकही आहेत. पूर्वी या पदासाठी बाबासाहेब चौगले यांचे नाव आघाडीवर होते. पण, ते अध्यक्ष झाले, तर आमचे ऐकणार का? हा प्रश्न डोंगळे यांच्यासह विश्वास पाटील यांच्यासमोर होता. त्यातून त्यांच्या नावाला विरोध झाल्याची चर्चा आहे.