
मंत्री झालेले भुजबळही ‘उप’ होणार; महाजनांचा मोठा दावा…
राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ चांगलेच नाराज झाले होते.
मात्र, आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मात्र, भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागताच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर देखील ते दावा करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच आता भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ पालकमंत्रीच काय तिसरे उपमुख्यमंत्री देखील होतील, असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्याला आणखी एक मुख्यमंत्री मिळणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार असल्याची चर्चा आहे, असं गिरीश महाजन यांना विचारलं असता ते म्हणाले, “चांगलं आहे, दावा करणं काय वाईट आहे का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं. ते तिसरे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात. हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की कोणाला पालकमंत्री आणि कोणाला उपमुख्यमंत्री करायचं?”, असं म्हणत महाजन यांनी भुजबळांच्या पालकमंत्रिपदाच्या चर्चांवर मिश्किल टिप्पणी केली आहे.