
सत्यजित तांबे काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत म्हणाले ; ‘फडणवीस साहेब…
माझा भाजप पक्ष प्रवेशाचा अजून काही विषय नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. जे लोक मला मार्गदर्शन करतात ते सांगतील मला कधी काय करायंच ते…
सध्या अपक्ष आहे आणि अपक्षचं चांगलं आहे”, असं सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय. ते एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी सत्यजित तांबे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
सत्यजित तांबे म्हणाले, काँग्रेसची मला चिंता वाटते. ही चिंता प्रेमामुळे सुद्धा वाटते. माझे शेवटी त्या पक्षावर प्रेम आहे. कारण त्या विचारातून आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. मात्र, जेव्हा आम्ही पाहातो की, तेथे काहीच होत नाही. कोणीच सिरीयस नाहीये. देशाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम सुरु आहे. देश एका बाजूला चाललाय. तुम्ही काहीतरी वेगळंच करताय. हे कुठंतरी मनाला खटकतं. राजकारण म्हणून सुद्धा तुमचं धोरण नेमकं काय? शशी थरुर यांना अमेरिकेत बाजू मांडण्यासाठी पाठवण्यात आलं. काँग्रेसने लगेच पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की, काँग्रेसमधून कोण पाठवायचं हे तुम्ही ठरवणार का? आम्ही आमचे नावं देणार… हे त्यांचेच नावं देणार जे त्यांचे आजू बाजूचे लोक आहेत. हे त्यांचेच नाव देणार जे त्यांचं लांगुणचालन करतात. ते शशी थरुर यांना संधी देणार नाहीत. चांगले लोक आहेत, ज्यांचे विचार चांगले आहेत, त्यांचा दिल्लीतील काँग्रेसची चांडाळचौकडी द्वेष करते. त्यांचा तिरस्कार करते. मला वाटतं की, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे.
बाळासाहेब थोरात यांचा पराभव का झाला ?
मला असं वाटतं की, आत्मविश्वास थोडा जास्त झाला. आमचा पराभव कधी होऊच शकत नाही, असा आम्हाला सगळ्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता. अनेक राजकीय कारणं आहेत. संगमनेर शहरात चुकीच्या मार्गांनी प्रपोगंडा झाला. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावण्यात आलं. आम्ही मुस्लिम धार्जिणे आहोत, थोरात साहेब मुस्लिम धार्जिणे आहेत, अशा प्रकारची प्रतिमा तयार करण्यात आली. लाडकी बहीणसारखी योजना आली होती, त्याचा परिणाम झाला. पैशाचा अमाप वापर झाला. या सगळ्या गोष्टीतून संगमनेर विधानसभेचा निकाल लागल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितलं.