
अजित पवारला काय सोनं लागलं आहे का? शरद सोनवणे यांच्या आडनावातच सोनं आहे; मात्र तो ‘बदला’ माणूस आहे. शिवसेनेची चाळीस हजार मते त्याला पडली, म्हणून तो आमदार झाला.
तो जर अपक्ष राहिला असता, तर माफ केले असते. तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्याने त्याला आता माफ करू नका अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शरद सोनवणे पुन्हा विधानसभेत दिसता कामा नये. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आमदार आपल्याला करावाच लागेल. यापुढे कोणतीही सेटलमेंट होणार नाही. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी पक्षकार्यकर्ते व पदाधिकार्यांना दिला.
नारायणगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांच्या आयोजित मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवार एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते नाहीत. अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत.
शिवसेना पक्ष संघर्षातून उभा राहिला आहे. आपण विरोधी पक्षात आहोत, याचे कार्यकर्त्यांनी भान ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर यावे. विधानसभेची उमेदवारी शरद पवार यांच्याकडे आम्ही मागितली होती. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म टिकविण्यासाठी ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिली.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या 64 हजार मतांपैकी शिवसेनेची चाळीस हजार मते आहेत. सोनवणे यांना मिळालेल्या मतांपैकी 40 हजार मते शिवसेनेची आहेत. तालुक्यात 80 हजार शिवसेनेची मते असून, जुन्नर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2029 च्या निवडणुकीत जुन्नरची जागा शिवसेना लढविणार आहे.
जुन्नरवर भगवा फडकविणार, हे निश्चित आहे. आ. सचिन अहिर म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. शिवसेनेची ताकद दाखवून द्या. काही लोकांनी स्वार्थासाठी दुसरा झेंडा खांद्यावर घेतला आहे. शेतकर्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करा. या वेळी बबनराव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.