
तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? या भावनेतून मित्रपक्षांमध्ये कुरघोड्या होत असतात. विचारसरणी वगैरे सब झूठ असते, राजकारण कशासाठी केले जाते आणि त्यासाठी एखाद्या विचारसरणीचा आधार का घेतला जातो, हे अशा कुरघोड्यांतून उघड होत असते.
धुळे विश्रामगृहाच्या एका कक्षात सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या कक्षात एक कोटी 84 लाख रुपये आढळले होते. ही रक्कम कुठून आली, कुणासाठी आली? त्याची माहिती विरोधकांना कशी मिळाली? या प्रश्नांच्या अधिकृत उत्तरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
म्हटले तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, म्हटले तर गंभीर नाहीही. गंभीर यासाठी की, विश्रामगृहाच्या या कक्षात पाच कोटी रुपये आहेत आणि ते विधीमंडळ अंदाज समितीतील आमदारांना देण्यासाठी गोळा करण्यात आले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी केला होता. त्यांनी संबंधित कक्षाला कुलूप ठोकून तेथेच ठिय्या मांडला होता. त्यानंतरच पंचनामा करण्यात आला आणि त्या कक्षामध्ये एक कोटी 84 लाख रुपये सापडल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
म्हटले तर हे प्रकरण गंभीर नाही, त्याचे कारण आहे या पक्षांचे सत्तेवर येणे. यासाठी थोडे मागे जावे लागेल. 2019 मध्ये शिवसेना – भाजपची युती तुटली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्या अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले असे कारण शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी दिले होते. हिंदुत्वासाठी एकत्र आलेल्या पक्षांना भ्रष्टाचार करण्याची मुभा असते का? याचे उत्तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी द्यायला हवे. त्यांचे उत्तर हो असेल तर हे प्रकरण गंभीर नाही, असे समजता येईल.
धर्म ही अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्स यांनी म्हटलेले आहे. याचा अर्थ असा की धर्माच्या नावाखाली माणूस खूप काही सहन करायला शिकतो. चाणाक्ष राजकीय नेत्यांच्या लक्षात ही बाब नाही आली तर नवलच म्हणावे लागेल. विविध अस्मिता, हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता अमुक खतरे मे, तमुक खतरे मे… अशा मुद्द्यांमध्ये लोकांना गुंतवून ठेवून राजकीय पक्ष, नेते आपला कार्यभाग साधत असतात. राज्यातील महायुती सरकारने हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतली आहे. त्याआडून काय काय केले जात असेल, याचा धुळे विश्रामगृहावरील प्रकार हा एक छोटासा नमुना म्हणावा लागेल.
हिंदुत्ववाद, धर्मनिरपेक्षता यापैकी एखादी विचाररसऱणी अंगीकरली की आपण वाट्टेल ते करायला मोकळे, अशी मुभाच जणू राजकीय पक्षांना मिळते. कार्यकर्ते आपापल्या पक्षांच्या अशा कृत्यांचा बचाव करण्यासाठी पुढे येतात. संबंधित पक्षांना मतदान केलेल्या बहुतांश समर्थकांनाही नेत्यांच्या अशा कृत्यांचे काहीही वाटत नाही, ही सर्वाधिक चिंतेची बाब बनली आहे. धुळ्यात सापडलेले पैसे कशासाठी गोळा करण्यात आले होते, हे अनिल गोटे यांनी सांगितले नसते तरी लोकांना कळले असते. यासाठीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली का, याचे उत्तर खरे तर लोकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारायला हवे.
सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षांतील कुरघोड्या नवीन नाहीत. भाजप हा ड्रायव्हिंग सीटवर आहे. दोन्ही मित्रपक्षांना आपल्याला हवे तसे कामाला लावण्याची ताकद देणारे आमदारांचे संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे ‘तेरी कमीज मेरी कमीज से सफेद नही होनी चाहिए…’ असे भाजपला सतत वाटत असते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही एकमेकांबद्दल आणि भाजपबद्दल असे वाटत असते. त्यातून सतत कुरघोड्या झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धुळ्यात अशा कुरघोडीतूनच रक्कम आढळल्याची चर्चा आहे. विरोधकांवर आणि मित्रपक्षांवर टीकेची एकही संधी न सोडणारे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धुळ्यात आढळलेल्या रकमेबाबत ब्र ही काढलेला नाही, हे विशेष.
जिल्ह्यात झालेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी विधीमंडळ अंदाज समिती जात असते. या समितीत आमदारांचा समावेश असतो. जाईल तेथे या आमदारांची बडदास्त ठेवली जाते. एखाद्या जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची विकासकामे होत असतात. कामे कशी होतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विधीमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांची ‘बडदास्त’ कशी ठेवली जाते, हेही लपून राहिलेले नाही. उलट, धुळे येथे आढळलेली रक्कम तुलनेने नगण्य अशीच आहे, असे म्हणावे लागेल.
धर्मनिरपक्षतेच्या रक्षणासाठी सत्तेवर असलेल्या काळातही ही समिती होती, बडदास्तही होती. आता हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे असे प्रकार लोक निमूटपणे सहन करतील. एसआयटीचा अहवाल येईल तोपर्यंत हे प्रकरण इतिहासजमा झालेले असेल. तेरी कमीज मेरी कमीज से सफेद नही, हे बिंबवण्यासाठीही या एसआयटीचा वापर होणार आहे.