
संजय शिरसाटांच्या मुलाच्या अफेअरबद्दल अंजली दमानियांनी सगळंच बाहेर काढलं…
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
संबंधित महिलेने आरोप केला आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणात ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, मला अतिशय शॉक बसला आहे. सगळे राजकारणी कुठल्या थराला जात आहेत. कौटुंबिक छळ कुठल्या थराला जात आहे. या मुलीचे स्टेटमेंट आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी तिला खूप धमक्या दिल्या आहेत. बंदूक स्वतःच्या डोक्याला लावून आत्महत्या करेल, असं देखील तिला धमकावलं गेलंय. ब्लेडने मी मला स्वतःला कापून घेईल, मानसिक छळ करून तिला लग्नाला भाग पाडलं. माझे वडील कॅबिनेट मंत्री होणार आहेत.म्हणून तुला मी घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हटले. हे खूप गंभीर आणि शॉकिंग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संजय शिरसाट यांनी ताबडतोब यावर भाष्य करावे
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा विषय समोर मांडला पाहिजे. त्यांनी तिला हीच धमकी दिली की, तू आमचं काही वाकडं करू शकत नाही. संजय शिरसाट यांनी ताबडतोब या सगळ्या विषयावर भाष्य केलं पाहिजे. नाहीतर शिंदेंनी त्यांच्यावर देखील कारवाई करायला पाहिजे. आम्ही ते करण्यासाठी भाग पाडू. मुलीवर दबाव कसा आणला आणि कसं तिला नांदवायला संभाजीनगरला घेऊन जाऊ शकत नाही? या सगळ्या विषयावर शिंदे आणि शिरसाट या दोघांनी बोललं पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत महिलेने केलेल्या आरोपांनुसार सोशल मीडियाद्वारे सिद्धांत शिरसाट यांच्याशी महिलेची सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांच्या भेटीगाठी आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर सिद्धांत शिरसाट यांनी आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत लग्नासाठी दबाव टाकला. याच आश्वासनावर विश्वास ठेवून 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने दोघांचे लग्न झाले. याचे पुरावे महिलेकडे असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. तर या संबंधातून तिची गर्भधारणा झाली होती, परंतु सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला, असा आरोप देखील महिलेने केलाय. लग्नानंतर सिद्धांत शिरसाट यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी महिलेला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितले. छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला, असे देखील महिलेने म्हटले आहे.