ठाणे (31) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पंधरा दिवसांवर येवून ठेपली असून त्या दृष्टीने ठाणे शहरातील मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांचे सखोल नियोजन पूर्ण झाले असून, निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार शहरातील 33 मतदान केंद्रांमध्ये एकूण 2013 मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागसमितीनिहाय मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येत असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये 266, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 186, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभागसमितीमध्ये 242, कळवा प्रभाग समितीअंतर्गत 263, उथळसर प्रभाग समितीमध्ये 158, वागळे प्रभाग समितीमध्ये 160, नौपाडा कोपरी प्रभागसमितीमध्ये 214, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये 269 आणि दिवा प्रभाग समितीमध्ये 255 मतदान केंद्र असणार आहेत.
मतदारांना सुलभ, सुरक्षित व पारदर्शक मतदान करता यावे यासाठी केंद्रांची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे. यामध्ये तळमजल्यावर 1207 कक्ष, पार्टीशन स्वरूपातील 361 कक्ष, मंडपामध्ये 403 कक्ष, तर पहिल्या मजल्यावर 42 कक्ष उपलब्ध असणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था, मतदान अधिकारी व पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ईव्हीएम व बॅलेट युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदन केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पडावी, यासाठी कक्षांची संख्या व मांडणी नियोजनपूर्वक करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला तसेच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक कक्ष ठेवण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प, रेलिंग, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल व पूर्वतयारी तपासणी केली जाणार आहे.
