
नाराज शिलेदाराच्या लेकीच्या लग्नाला शिंदे लावणार हजेरी; नेता गळाला ?
नाशिकमध्ये स्नानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मात्तबरांनी साथ सोडत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हेही शिंदेंच्या गळाला लागतील अशा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे.
विलास शिंदे यांची कन्या श्रद्धा हिच्या विवाहानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवार( दि. २) नाशिकमध्ये येत आहेत. खास उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्याच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे येणार असल्याने विलास शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटात नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे यांचा गट व भाजपकडून करण्यात येतो आहे. काही प्रमाणात त्यांचा हा प्रयत्न सफलही झाला आहे. गणेश धात्रक, नरेंद्र दराडे, निर्मला गावित यांच्यासारखे ठाकरेंचे विश्वासू शिलेदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत.
अशातच विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण स्वीकारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यात विलास शिंदे यांचा उल्लेख शिवसेना महानगरप्रमुख असा केल्याने ठाकरे सेनेची धडधड वाढली आहे.
शिवसेना फुटल्यानंतर शिवेसेनेत दोन गट तयार झाले. त्यावेळी विलास शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीले. एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना महानगरप्रमुखपद देण्यात आलं. महागरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाने शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. मात्र लेकीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विलास शिंदे यांनी शिंदे गटात जाण्याचा काही डाव टाकला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुपारी तीन वाजता गंगापूर रोडवरील विलास शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे फायरब्रॅण्ड नेते खासदार संजय राऊत हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे देखील एका विवाह सोहळ्यानिमित्त आज (दि. 2) नाशिकमध्ये येत आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच विवाह सोहळ्यानिमित्त नाशिक मुक्कामी असल्याने नाशिकमध्ये आज मंत्र्यांच्या मांदियाळी पाहायला मिळणार आहे.