
अखेर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडलं मौन…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात नोकऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. AI मुळे सुमारे 1.80 लाख नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते, असा अंदाज काही अहवालांमधून व्यक्त करण्यात आला आहे.
यावर आता गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी मौन सोडले असून AI आणि नोकऱ्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, AI तंत्रज्ञान नोकऱ्या हिरावून घेणार नाही, तर कर्मचाऱ्यांना सहाय्य करणारी ठरणार आहे. AI ही एक “अॅक्सेलरेटर” म्हणजेच कामाला गती देणारे साधन आहे. इंजिनिअर्सना रोजच्या कंटाळवाण्या कामांपासून हे तंत्रज्ञान मुक्त करून अधिक महत्त्वाच्या आणि सर्जनशील कामांकडे वळण्यास मदत करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
गुगलने 2023 मध्ये 12,000 आणि 2024 मध्ये 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. मात्र, 2025 मध्ये कंपनीने फारच मर्यादित आणि टार्गेटेड स्वरूपातच कपात केली आहे. जसं की क्लाउड टीममधील 100 पेक्षा कमी आणि डिव्हाइसेस युनिटमधील काही शंभर कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर कपातीचा कोणताही धोका नाही.
भविष्यातील संधी
पिचाई यांच्या म्हणण्यानुसार, गुगल AI चा वापर नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी करत आहे, ज्यामुळे भविष्यात नवीन नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील. त्यांनी ‘वायमो’ (सेल्फ-ड्रायव्हिंग कार), क्वांटम संगणक आणि यूट्यूब सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. विशेषतः भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत यूट्यूबची वाढ ही गुगलसाठी मोठी संधी असल्याचं ते म्हणाले.
AI मुळे नोकऱ्यांवर धोका निर्माण होणार असल्याच्या भीतीवर सुंदर पिचाई यांनी पडदा टाकला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, AI हे कर्मचाऱ्यांचे प्रतिस्पर्धी नाही, तर सहकारी आहे. त्यामुळे भविष्यातील कामकाज अधिक वेगवान, प्रभावी आणि सर्जनशील होणार आहे. गुगलमध्ये छटणीचा धोका फारसा नाही, उलट नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगारनिर्मितीच होणार आहे.