नेमकी राजकीय कोंडी काय…
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता दल, जनसुराज्य व भाजपा यांची युती झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीने पाठीशी राहिलेल्या जनता दलाच्या नेत्या प्रा. स्वाती कोरी यांच्या मदतीची परतफेड कशी करायची?
असे धर्मसंकट शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे व डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, मंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांच्यात अटीतटीचा सामना झाला. त्यावेळी जनता दलाच्या माजी नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी घाटगे यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. गडहिंग्लज शहरासह कडगाव-कौलगे मतदारसंघ पिंजून काढला. मुश्रीफांच्या विरोधात आक्रमक भाषणे करून कागलमध्येही हवा तयार केली होती.
गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी व जनता दलात टोकाचा संघर्ष सुरू आहे. म्हणूनच, जनता दलाच्या ‘धर्मनिरपेक्ष’तेची चौकट बाजूला ठेवून पूर्वाश्रमी मित्रपक्ष असणाऱ्या ‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून भाजपाशी हात मिळवून मुश्रीफांना नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय प्रा. कोरींना घेतला आहे. यामुळेच येथील निवडणुकीत समरजित घाटगे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी भाजपा सोडून कुणाशीही आघाडी करण्याची मुभा कार्यकर्त्यांना दिली आहे. परंतु, मित्रपक्ष असणाऱ्या जनता दलाने जनसुराज्य व भाजपाशी हात मिळवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच समरजित घाटगे स्वातीताईंच्या मदतीची परतफेड कशी करणार ? याकडे गडहिंग्लजचे लक्ष लागले आहे.
‘नंदाताईं’च्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात लढलेल्या नंदाताईंनाही स्वातीताईंनी सक्रिय पाठिंबा दिला होता. परंतु, चंदगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत राजेश पाटील व नंदाताई दोघेही एकत्र आले आहेत. त्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्यामुळे नंदाताई गडहिंग्लजमध्ये कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मदतीची जाणीव?
गेल्या विधानसभा निवडणुकीत गडहिंग्लज शहरात मुश्रीफ यांना २०२६८ पैकी १०२०७ तर घाटगे यांना ९३५० मते मिळाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची फारशी ताकद नसतानाही स्वातीताईंच्या मदतीमुळेच हे शक्य झाल्याची जाणीव घाटगेंना आहे. त्याची परतफेड ते कशी करतात, याची उत्सुकता शहरवासियांत आहे.
घाटगे यांनी घेतल्या मुलाखती
गुरुवारी समरजित घाटगे यांनी येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर प्रा. कोरी यांची भेट घेऊन चर्चाही केली. मात्र, चर्चेत का ठरले ते गुलदस्त्यातच आहे.


