
सपकाळांच्या टोमण्यांनी भाजप ‘बेहाल’…
भाजपमध्ये काँग्रेसच्या राजकीय नेत्यांच्या प्रवेशावरून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टोलेबाजी केली.
भाजप ही नेता खाणारी चेटकीण झाली असून, काहींना लालूच दाखवून हे प्रवेश घडविले जात आहे.
काहींचे प्रवेश इच्छेने होत नसल्याने त्यांना भीती देखील दाखवली जात आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. कुठल्याही गोष्टीचा उत्सव करणे म्हणजे सत्ता, असे यांचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असून, भाजपसाठी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे, रामदेव बाबा आता कुठे आहे?”, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वोदयी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या जाती-धर्मांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. समाज-समाजात तेढ निर्माण करून सत्तेची खुर्ची समाजासाठी कशी घातक आहे, यावर बोट ठेवलं. याचवेळी काँग्रेसने देशासाठी कसं बलिदान याकडे लक्ष वेधलं. याशिवाय काँग्रेसमधून सत्ताधारी भाजपकडे जाणाऱ्यांचा देखील समाचार घेतला.
सपकाळ म्हणाले, ”केंद्रात आणि राज्यात भाजपची(BJP)सत्ता आहे. हे बघून काही स्वार्थी लोक सत्तेसाठी त्यांच्याकडे जात आहे. त्याही पेक्षा सत्ताधारी तपास यंत्रणांची भीती दाखवून त्यांना आपल्याकडे खेचून घेत आहेत. मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा लेखा जोखा त्यांनी मांडला पाहिजे. फक्त बोलायचा भात बोलाची कडी, असेच भाजप आणि मोदी सरकारचे धोरण आहे.
कुठल्याही गोष्टीचा उत्सव करणे म्हणजे सत्ता नव्हे, असा टोमणा मारताना, भाजपसाठी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे, रामदेव बाबा यांनी आता पेट्रोलचे दर किती कमी झाले? लोकपालांच्या नियुक्तीचे काय झाले? याचा जाब सरकारला विचारावा आणि जनतेला उत्तरे द्यावी, अशी कोपरखळी देखील सपकाळ यांनी लगावली.
मुंबईतील रेल्वे लोकल अपघातावर हर्षवर्धन सपकाळ यांनी दुःख व्यक्त केलं. मुंबईतील लोकल अपघाताची घटना अत्यंत दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले. जाहिरातबाजी करण्यात हे सरकार मश्गूल आहे. या घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.