
मुंबई : मुंब्रा येथे सोमवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. याबाबत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी दुःख व्यक्त केले. या अपघातासाठी रेल्वे मंत्रालय जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आपला देश खूप मोठा आहे आणि सध्या आपण वेगाने विकास करत आहोत. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पण, दुसरीकडे रेल्वे गाड्यांची अशी अवस्था आहे. अनेकदा तर गर्दीमुळे लोक डब्याच्या वर बसून प्रवास करतात, ही अत्यंत वाईट परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
अबू आझमी म्हणाले की, आपला देश खूप मोठा आहे. तो वेगाने विकसित देखील होतो आहे. पण, दुसरीकडे रेल्वे गाड्यांची परिस्थिती अशी आहे. अनेकदा लोक डब्यावर बसून प्रवास करतात. तर 24 – 24 तास उभं राहूनही प्रवास करतात. लोकल ट्रेनमध्ये तर अशी परिस्थिती आहे की, गाडीत माणसं चढतील कशी आणि सुखरूप उतरू शकतील की नाही, याची काही शाश्वती नाही. एखाद्याला दादरला उतरायचे असेल तर अनेकदा तो चर्चगेटला जाऊन पोहोचतो, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आझमी यांनी बजरंग दल तसेच रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांवरही टीका केली. हे कार्यकर्ते रस्त्यावर उभे राहून ट्रक अडवतात, आणि सांगतात की यात म्हशी आहेत. बकऱ्यांना देखील टेम्पोमधून पाठवताना त्रास होऊ नये याची काळजी घेतात. त्यापेक्षा जास्त संख्या असेल तर ट्रक अडवतात. मग, हीच गोष्ट हे लोक माणसांच्या बाबतीत का करत नाहीत, असा सवाल आझमी यांनी केला. तुम्हाला प्राण्यांबद्दल प्रेम आहे, माणसांबद्दल नाही का?
देशभरातील लोक आज मुंबईत येऊन राहतात. ते सकाळी हा विचार करून घराबाहेर पडतात की काहीतरी पैसा कमावून संध्याकाळी घरी येतील. पण, ट्रेनमध्ये चढणे आणि उतरणे किती कठीण झाले आहे. मुंब्रा स्टेशनच्या बाबतीत तर अनेकदा हा प्रश्न समोर येतो. त्यामुळेच येथून लोकल सुरू करण्याची तसेच येथे फास्ट ट्रेन थांबवण्याची मागणी सातत्याने होते आहे. इथे अनेक समस्या आहेत. अनेक वर्षांपासून येथील लोक संघर्ष करत आहेत. पण कोणीही त्यांचे ऐकून घ्यायला तयार नाही, अशी खंतही आझमी यांनी व्यक्त केली.