
नवी दिल्ली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेत भारताने सिंधू जल करार स्थगित केला. यामुळे, पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली.
त्यामुळेच, आता जगभरात जिथे जाईल तिथे भारताने सिंधू नदीचे पाणी आम्हाला द्यावे, अशी विनंती पाकिस्तान करतो आहे. मात्र, भारताने आपली भूमिका कायम ठेवली असून जोवर दहशतावादासंबंधी भारताचे प्रश्न मिटत नाहीत, तोवर भारत सिंधू जल करारावर कोणतीही चर्चा करणार नाही, असे भारताने ठामपणे सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधू जल करार स्थगितीवर भारताने पुनर्विचार करावा, अशी विनंती पाकिस्तानचे जलसंधारण सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी अनेकदा केली आहे. मुर्तजा यांचे भारतीय समकक्ष देबाश्री मुखर्जी यांना लिहिलेल्या अनेक पत्रांमध्ये मुर्तजा यांनी याबाबत पुनर्विचाराची विनंती केली आहे. पण, भारताने पाकिस्तानच्या एकाही पत्राचे उत्तर दिलेले नाही.
भारताचे म्हणणे आहे की, जोपर्यंत दहशतवादाशी संबंधित भारताच्या प्रश्नांचे निराकरण होत नाही, आणि या कराराला नवीन रूप दिले जात नाही, तोवर भारत या विषयावर काहीही चर्चा करणार नाही. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 1960 च्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले. मुखर्जी यांनी अधिकृतरित्या भारताचा हा निर्णय पाकिस्तानला कळवला होता.
सिंधू जल करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांनी स्वाक्षरी केली होती. यात जागतिक बॅंकेने मध्यस्थी केली होती. दोन्ही देशांदरम्यान नद्यांच्या पाणी वाटपाच्या अटी निश्चित करून वाद संपवणे हा या कराराचा उद्देश होता.
पाकिस्तानची जवळ 80 टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंधू जल कराराला भारताने स्थगिती दिल्याने पाकिस्तानमध्ये सिंधू नदीचे पाणी जात नाही. यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून याचा थेट परिणाम त्यांच्या शेतीवर होतो आहे.