
मुंबई : महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करताच भारतीय जनता पक्षाच्या अंगात आग्या वेताळ संचारला आहे.
आग्या वेताळ हे एक पिशाच आहे आणि सर्व शरीराला आग लावून ते दुसऱ्यांच्या घरांना आग लावीत फिरत असते. हा एक प्रकारचा त्रस्त समंध असतो. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भुरटेगिरीवर हल्ला करताच भाजपाच्या अंगात हा वेताळ संचारला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे
राहुल गांधी यांनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवर आपले मत व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी देशातील अनेक वृत्तपत्रांत लेख लिहून महाराष्ट्राच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने कशी चोरी केली, याची सविस्तर माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे सर्व मॅच फिक्सिंग कसे झाले, हा सर्व प्रकार लोकशाहीला कसा घातक आहे आणि महाराष्ट्रानंतर येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीतही हाच ‘मॅच फिक्सिंग’चा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे, याचा खुलासा राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखामधून केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदी आणि कंपनीचा दारुण पराभव केला. ‘अब की बार चारसौ पार’चे स्वप्न महाराष्ट्रामुळे हुकले. इतका महाराष्ट्राचा निर्धार पक्का होता. त्यानंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक झाली. मात्र या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून पन्नास जागाही मिळाल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत एवढा उलटफेर कसा होऊ शकतो? हे कुणाला तरी पटेल काय? असे सवाल करून त्यांनी निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.