
मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का ?
महाराष्ट्र सरकारकडून ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या लोकप्रिय योजना मोठ्या गाजावाजात राबविल्या जात असतानाच, संतांचा आणि वारकऱ्यांचा वारसा जपणाऱ्या वारकऱ्यांबाबत सरकारला विसर पडला का?
असा संतप्त सवाल वारकर्यांकडून (Warkari) उपस्थित करण्यात आला आहे. विठूनामाच्या जयघोषात सुरू झालेल्या वारीत आर्थिक सहाय्याच्या अभावामुळे यंदा नाराजीचा सूर उमटत आहे.
मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. मात्र, यंदा वारी (Ashadhi Wari 2025) सुरू झाली असतानाही सरकारकडून कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.
निधीबाबत अद्याप निर्णय नाहीच
मागील वर्षी निवडणुका असल्यामुळे आर्थिक मदत दिली होती का? या वर्षी निवडणूक नाही, म्हणून वारकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवलं जातंय का? असे संतप्त सवाल वारकरी संप्रदायातून उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत वारकऱ्यांना निधी देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनी दिली आहे.
राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला आहे का?
त्यामुळे लाडकी बहीण योजना राबविणाऱ्या राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला आहे का? असा सवाल उपस्थित करत वारकऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. यंदा महाराष्ट्र शासनाने पालखी सोहळ्यासाठी वॉटरप्रूफ मंडप, मोबाईल टॉयलेट, मेडिकल टीम्स या मूलभूत सुविधा पुरविल्या आहेत. मात्र आमची मागणी आहे की, ज्याप्रमाणे मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपयांचा निधी दिला होता. तसाच निधी यंदाही द्यावा.आम्हाला अपेक्षा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरात लवकर मदत जाहीर करतील, असेही सोमनाथ घोटेकर यांनी म्हटले आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम
दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.