
सत्तेत असल्याने स्थानिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये जाण्यास अनेकांची चढाओढ सुरू आहे. भाजपनेही आपली दारे सर्वांसाठी खुली करून ठेवली आहेत.
असे असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन ‘तुतारी’ हाती घेतली आहे. ‘बाहेरच्यांना पायघड्या आणि निष्ठावंताच्या हाती सतरंज्या’ या भाजपच्या धोरणामुळे कार्यकर्ते दुखावले असल्याचा टोला यावेळी सलील देशमुख यांनी लगावला.
काटोल विधानसभा मतदारसंघातील सावरगाव सर्कल बानोर पिठारीचे उपसरपंच शेखर पांडे, नीलेश पांडे, निखील चौधरी यांच्यासह भाजपाच्या अनेक निष्ठावंत पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. काटोल-नरखेड तालुक्यात आयारामांना संधी दिली जाते आणि निष्ठवंतावर अन्याय होत असल्याने भाजपतील कार्यकर्ते नाराज आहेत. हे बघता आगामी काळात शेकडो कार्यकर्ते आमच्या पक्षात येणार असल्याचा दावाही देशमुख यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीर सभेत भाजपाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करु असे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनांचा विसर सत्तेत येताच विसर पडला आहे. लाडकी बहिणीच्या भरवशावर सत्ता मिळाली परंतु आता त्यांनाच सापत्न वागणूक दिली जात आहे. अनेक बहिणींची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांनी तब्बल पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी त्यांच्याऐवजी सलील देशमुख यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. ते भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याकडून पराभूत झाले आहेत.
हा पराभव देशमुख कुटुंबाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निकालाच्या विरोधात सलील देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणुकीच्या निकालावर त्यांनी शंका व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन जिल्हा परिषद सदस्य यापूर्वी भाजपात दाखल झाले आहेत.