
खासदार सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारला प्रश्न…
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावातील नागरिकांच्या मिळकत करवसुली करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर या गावांना वेगळा न्याय लावला जात असून, गावांकडून करवसुली करण्याची चर्चा सुरू आहे, हे योग्य नाही.
या गावांमध्ये कोणत्याही सुविधा दिल्या जात नसताना कर कसला गोळा करता,’ असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
‘शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची प्रश्न बिकट होत चालला आहे. गुरुवारी गंगाधाम चौकात अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला. महापालिकेने आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत. पाणी, रस्ते, तसेच महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या पावसाळापूर्वीच्या कामांचा आढावा आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत घेण्यात आला,’ असे खासदार सुळे यांनी सांगितले.
‘आसावरी जगदाळे हिला महापालिकेत नोकरी द्या’
‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या नागरिकांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी अशी मागणी होती. पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला महापालिकेत नोकरी मिळावी, अशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. पण, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती करावी,’ अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.
प्रभाग रचना पारदर्शकपणे करावी’
‘महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागरचना करताना ती पारदर्शकपणे आणि सूत्राला धरून केली पाहिजे. कोण काय सांगत आहे यावरून प्रभाग रचना केली जाऊ नये,’ अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली. तसेच, ‘संपूर्ण राज्यातील प्रभाग रचना पारदर्शक झाली पाहिजे,’ असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.