
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरुन अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे.
तसेच त्यांच्यात चर्चा देखील झाली मात्र अद्यापही बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत. दुसरीकडे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. सरकारने तात्काळ पावले उचलली नाहीत तर राज्यभर शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध…
नाना पटोले म्हणाले की, “काँग्रेस बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देते. सरकारनं बच्चू कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीनं पूर्ण कराव्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन काँग्रेस राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि गावस्तरापासून शेतकरी आंदोलन उभं करेल. शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध केला जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच बच्चू कडू ज्या महायुती सरकारचा एक भाग होते, त्याच सरकारकडून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करून दिला. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल. कर्जाची वर्गवारी तयार करून अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. तसेच दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिले.
तसेच बच्चू कडूंनी मागावे घ्यावे असेही आवाहन बावनकुळे यांनी केले. मात्र पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी जाहीर केले.