
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महायुती सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या पोस्टरला काळे फासून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीतील बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंगला पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र आता त्याच मुद्द्यावर सरकार मौन बाळगते आहे. शेतकऱ्यांनी यांना मतदान दिले, पण आता त्यांची फसवणूक केली जात आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या नेत्यांना गावात प्रवेश नाकारावा, अशी आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले की, गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी प्रश्न टाळले. हा मुद्दा सरकारकडून दुर्लक्षित होत असून हे गंभीर आहे. येत्या २० जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला वेळ द्यावा, अशी प्रशासनाला विनंती आहे. वेळ दिला नाही तर आम्ही गांधीगिरी करूनही आमचे म्हणणे मांडू, असे त्यांनी स्पष्टच सांगितले.