
म्हणाले; 29 ऑगस्टनंतर आता 7 कोटी मराठा….
मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गा लावावा अशी मागणी करत आहेत. मराठे आणि कुणबी एकच असून राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी ते करत आहेत.
मात्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही, असं जरांगे यांनी म्हटलंय. तसेच जरांगे यांनी सरकारला यावेळी थेट अल्टिमेटम दिलंय. येत्या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा गुलाल घेऊन येतो. मी 29 ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आणि कुणबी एक आहे
मनोज जरांगे हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण तसेच त्यांची आगामी रणनीती याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 14 जून रोजीपासून फोन करणार आहे. आम्ही प्रत्येक आमदाराला अंतरवाली सराटीमध्ये बोलवणार आहोत. विधानपरिषदेच्या आमदारांनाही आम्ही बोलवणार आहोत. यात आजी-माजी आमदार, खासदारही असतील. मराठा आणि कुणबी एक आहे. त्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारीत करावा. सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या आम्ही त्यांना करणार आहोत.
मुंबईत आलो तर परत जाणार नाही
मी 29 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही शब्द बोलणार नाही. आजपासून तीन महिने मी कोणालाही काहीही बोलणार नाही. येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. आम्ही गुलाल घेऊन येतो. पण 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईत यायची वेळ येऊ देऊ नका. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी यावेळी मुंबई सोडणार नाही. माझ्या समाजाने वाशी येथून परत जाऊन तुम्हाला वेळ दिला होता. आता मात्र आम्ही वापस जाणार नाहीत. आमची अडवणूक करू नका, आमची फसवणूक करू नका. आमची मुलं फाशी घेत आहेत.
यावेळी दहापट मराठा…
सोपा विषय आहे. आमच्या नावावर सातबारा असेल तर शेत मोजून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. 29 ऑगस्टनंतर मी कोणलाही जवळ येऊ देणार नाही. यावेळी दहापट मराठा मुंबईत जातील. सर्व सात कोटी मराठा हे मुंबईत असतील, असा अशाराच मनोज जरांगे यांनी दिला.