
सांगलीमध्ये वसंतदादा पाटील घराण्यातील मोठा गट अखेर भाजपच्या गळाला लागला आहे. विधानसभा निवडणुकीला बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
त्यामुळे सांगलीच्या राजकारणात भाजपला बळ मिळाले असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दादा घराण्यातून मोठा गट गळाला लागला आहे. जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा प्रवेश होणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे समित कदम, भाजपचे शेखर इनामदार, सी.बी. पाटील आदी नेत्यांनी जयश्री पाटील यांची निवासस्थानी भेट दिली. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मदन पाटील गट भाजपसोबत घेण्यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्री पाटील यांना संपर्क केला होता. चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी
विधानसभेच्या निवडणुकीत जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यानंतर वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला.
सांगलीतील निवडणुकांमध्ये वसंतदादा घराण्याचा दबदबा
सांगली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 16 निवडणुका काँग्रेसने जिंकले आहेत. त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने जिंकल्या. 1980 मध्ये वसंतदादा पाटील यांनी स्वतः इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या. वसंतदादा पाटील यांच्याबरोबर शालिनीताई पाटील, प्रकाश बापू पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत.
विशाल पाटील अपक्ष निवडून आले
प्रतीक पाटील यांचा 2009 मध्ये विजय झाल्यावर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये विशाल पाटील यांना लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवारी मिळाली नाही. सांगलीची जागा शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. 2019 ची लोकसभा विशाल पाटील लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतून काँग्रेसला जागा मिळाली नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंड केले करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले.