
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांचा वाजत गाजत भाजप प्रवेश झाला. मंगळवारी अनेक नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मात्र त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांवरच आता तोंड लपविण्याची किंवा सारवासारव करण्याची वेळ आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते बडगुजर यांनी भाजप प्रवेश केला. त्यासोबत माजी मंत्री बबन घोलप यांनीही प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हा प्रवेश आता भाजपला खुलासा करता करता अडचणीत टाकणारा ठरणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नितेश राणे यांना कोंडीत पकडत त्यांचा पोपट झाला, या शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर प्रकरणात नितेश राणे हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील शिक्षा झालेला सलीम कुत्ता या आरोपी सोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केली, असे बोलले जाते. पार्टीची छायाचित्रे भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट विधानसभेत झळकवली होती. हा दारूगोळा त्यांना सिडकोतीलच भाजपच्या काही नेत्यांनी पुरवला होता. त्यावर विधिमंडळात गोंधळ देखील झाला.
हा विषय उपस्थित करताना आमदार राणे यांनी सुधाकर बडगुजर हे देशद्रोही आहेत असे विधान केले होते. एक पाऊल पुढे जात त्यांच्याच पक्षाच्या अन्य नेत्याने हे प्रकरण थेट देशाविरुद्ध असल्याने त्याची विशेष एसआयटी नियुक्त करून चौकशी केली जाईल असे विधान केले. आता हेच श्री बडगुजर भाजप वासी झाले आहेत.
त्यामुळे आगामी काही काळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या प्रश्नावर उत्तरे द्यावी लागतील हे निश्चित आहे. सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात भाजपच्याच नेत्यांचा पुढाकार होता. आमदार सीमा हिरे यांनी तर त्यांच्या गुन्ह्यांची यादीच वाचून दाखविली होती. त्यामुळे नितेश राणे यांनी बडगुजर यांना भारतीय जनता पक्षात येण्याचे निमंत्रण म्हणूनच त्यांच्यावर आरोप केले नव्हते ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. सर्व प्रकरणात नितेश राणे यांचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही पोपट झाला एवढे मात्र नक्की.