
महाराष्ट्रातील लाखो वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीची ओढ लागली असून आषाढी एकादशीसाठी शेकडो दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांचेही प्रस्थान होण्यास सुरुवात झाली असून देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते तुकाराम महाराजांच्या पालखीती पादुकांचे पूजन झाले. पादुकांची पूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होत असून पहिला मुक्काम याच ठिकाणी असतो. दुसऱ्या दिवशी पालखी आकुर्डीच्या दिशेने रवाना होता. तुकोबारायांच्या जयघोषात हजारो वारकरी आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहुत जमले असून टाळ मृदुंगांचा गजर करताना दिसून आले. दरम्यान, पादुका पूजन सोहळा सुरू असल्याने वारकऱ्यांच्या दिंड्या थांबवण्यात आल्या होता. त्यावेळी, वारकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. आता, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत दिंड्या थांबविण्याचं कारण सांगितलं आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणााले.
देहुत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपला विचार हा वैश्विक विचार आहे. जगाला साद घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे. त्यामुळे ह्या विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे. अर्थात जोपर्यंत वारी आहे, तो पर्यंत हा विचार संपणार नाहीच. कारण जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत वारी असणार आहेच. मूलतत्त्व ठेवून आधुनिक मार्गाने संतांच्या विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी देहुतून व्यक्त केला. इंद्रायणी स्वच्छ करायचं आपण नेहमी म्हणतो. मात्र, जो पर्यंत सिवेज योग्यरीत्या होणार नाहीत, तो पर्यंत हे अशक्य आहे. त्यादृष्टीने आपण आज दोन एसटीपीचे लोकार्पण केले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
देहुत तुकोबांच्या पालखीतील पादुकांचे पूजन सुरू असल्याने मंदिर परिसराबाहेर दिंड्या थांबवण्यात आल्या होता. या दिंड्यांतील वारकरी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मानाच्या दिंड्यांना पादुका पूजन सोहळ्यावेळी थांबविण्यात आले, त्यातील वारकऱ्यांना आतमध्ये प्रवेश न दिल्याने वारकरी संतप्त झाले होते. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी ज्याप्रकारे सुव्यवस्था ठेवली पाहिजे, त्याच प्रकारे ठेवली आहे. एकावेळी सगळ्यांना सोडलं तर याठिकाणी चेंगराचेंगरी होईल. त्यामुळे, वारकऱ्यांची सुरक्षा आम्हाला महत्त्वाची आहे. याशिवाय, आमचा वारकरी अशा गोष्टींची पर्वा करत नाही, तासभर थांबलं, अर्धा तास थांबावं लागलं. कारण, माऊलींच्या भेटीसाठी वारकरी शिस्तीत दर्शन घेईल, असेही फडणवीसांनी म्हटले. दरम्यान, यावेळी काही वारकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकल्याचं पाहायला मिळालं.