
क्रॉस व्होटिंगने मतमोजणीत ट्विस्ट…
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या मतमोजणीत आतापर्यंतच्या आढाव्यानुसार मोठ्याप्रमाणावर क्रॉस व्होटींग झाल्याचे पहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: जरी ब गटातून निवडून आले असले तरी इतर गटांमधे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवारांकडून कडवी लढत पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी या कारखान्याला 500 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. यानंतर अजितदादांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करुन त्यांच्या निळकंठेश्वर या संपूर्ण पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. मात्र, मतदारांनी अजित पवारांच्या पॅनेल बरोबरच तावरेंच्या पॅनेलला देखील मतदान केल्याच प्रथमदर्शनी पहायला मिळत आहे.
या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याने निकाल काय लागणार, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा निकाल लागण्यासाठी आणखी काही तासांचा अवघी लागेल. अजित पवार स्वत: ब गटातून निवडून आले असले तरी त्यांच्या पॅनलचे इतर उमेदवार निवडून येणार का, हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.
अजितदादांचा आणखी एक मोहरा आघाडीवर
माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रंगतदार अवस्थेत आहे. अजित पवार पॅनेलचे उमेदवार रतनकुमार भोसले हे सध्या आघाडीवर आहेत. त्यांनी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. याच प्रवर्गातून रिंगणात असणारे बापूराव गायकवाड हे सध्या पिछाडीवर आहेत.
अजित पवारांचा पहिला दणदणीत विजय
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत. काहीवेळापूर्वीच या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.