
इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य !
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला.
अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणने अमेरिकन लष्कराच्या कतार येथील तळांवर क्षेपणास्त्र डागले. हे युद्ध आता कोणत्या वळवणार जाणार, याकडे जगाचे लक्ष लागले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केला. परंतु, यानंतर काही तासात स्थिती पुन्हा जैसे थे झाली. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र विभागाकडून महत्त्वाची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच मशहाद येथील भारतीय दूतावासाचा कॉन्टॅक्ट डेस्क बंद करण्यात आला आहे.
इराणमधील भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट करत मशहाद येथील कॉन्टॅक्ट डेस्क बंद करत असल्याची माहिती दिली. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर भारतीय दूतावासाने निर्वासितांसाठी नवीन नावे नोंदणी करण्यासाठी उघडण्यात आलेला संपर्क कक्ष बंद केला आहे. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला पुन्हा धोका निर्माण परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, असे इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
इराणमधील भारतीयांनी दूतावासाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे
जे भारतीय इराणच्या इतर भागात आहेत आणि तेथून बाहेर पडण्यासाठी मशहादला येण्याची योजना आखत आहेत, अशांना ते जिथे आहेत तिथेच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच स्थानिक वृत्ते आणि दूतावासाने जारी केलेल्या अद्ययावत माहिती, सूचनांवर लक्ष ठेवावे, असेही इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. दूतावास सद्र हॉटेलमधील खोल्या आणखी २ रात्रींसाठी (२६ जून रोजी चेकआउट वेळेपर्यंत) राखून ठेवेल. यामुळे नागरिकांना इराणमधील सुरक्षा परिस्थिती खरोखरच सामान्य होत आहे, याची खात्री करण्यासाठी वेळ मिळेल. जर कोणाही भारतीय नागरिकांना कोणत्याही सल्ल्याची किंवा मदतीची आवश्यकता असेल किंवा अन्य महत्त्वाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी टेलिग्राम चॅनेलद्वारे किंवा पूर्वी दिलेल्या हेल्पलाइनवर दूतावासाशी संपर्क साधू शकतात. पुढील काही दिवसांसाठी हे संपर्क चॅनेल खुले राहतील, असेही इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात काय म्हटले आहे?
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, इराण आणि इस्रायलमधील संघर्षाशी संबंधित घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. इराणच्या अणुतळांवर अमेरिकेची कारवाई आणि कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने केलेला प्रत्युत्तर या घडामोडींचा यात समावेश आहे. एकात्मिक शाश्वत प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेबाबत आम्हाला खूप चिंता आहे. परंतु, इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामाचे वृत्त आणि ते घडवून आणण्यात अमेरिका आणि कतारने बजावलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. या प्रदेशातील अनेक मुद्दे सोडवण्यासाठी संवादाला पर्याय नाही, हे आम्ही पुन्हा सांगू इच्छितो. भारत या प्रयत्नांमध्ये आपली भूमिका बजावण्यास तयार आहे आणि सर्व संबंधित पक्ष शाश्वत शांतता आणि स्थिरतेसाठी काम करतील, अशी आशा भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे.