
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
मुंबई, दि. २६ : राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
राजभवन येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ तसेच २०२२ या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.
एक्केचाळीस (४१ ) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, तीन (३) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच एकोणचाळीस (३९) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
पोलीस अलंकरण कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांसह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.