दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मराठा साम्राजाच्या कोल्हापूर संस्थानातील छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापुरातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव असे होते. कोल्हापूर संस्थानातील चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 मध्ये जयसिंगराव व राधाबाई यांचे पुत्र यशवंत यांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नाव ठेवले. त्यानंतर शाहू महाराजानी धारवाड, राजकोट येथे शैक्षणिक व शारीरिक शिक्षण घेतले. राजकोट येथे राजे महाराजे यांच्या मुलांना शिक्षण देत असलेल्या संस्थेमध्ये त्यांच्यावरती राज्यसंस्कार झाले. माता आनंदीबाई यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच इतर महान व्यक्तींच्या पराक्रमाचा वारसा सांगितला व छत्रपती घराण्याची परंपरा ज्ञात करून दिली. लहानपणापासून शाहू महाराज चाणक्ष्य होते. समाजातील लहानशा गोष्टीत त्यांचे नेहमी लक्ष असायचे. अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते. राजकोटच्या राजकुमार कॉलेजमधील शिक्षणामुळे, प्रवासामुळे शाहू महाराज प्रचंड व्यवहारज्ञानी बनले होते. यातूनच त्यांच व्यक्तीमत्व अधिकच खुलले होते. राजकोट येथे शिक्षण चालू असतानाच त्यांचा विवाह बडोद्यातील गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी दि. 1 एप्रिल 1891 रोजी झाला. पुढे 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक म्हणजे राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेकानंतर शाहु महाराजांनी स्वराज्याचा दौरा केला, रयतेने गावागावांत छत्रपतींचे स्वागत केले. महाराजांना रयतेच्या प्रश्नांची जाण होतीच, पण राज्याभिषेकानंतर ते प्रश्न अधिक संवेदनशीलतेणे जाणून ते सोडविण्याचा प्रयत्न केला.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा तो काळ म्हणजे स्वातंत्र्या पूर्वीचा 50 ते 60 वर्षांपूर्वीचा काळ होता. त्याकाळची समाजिक परिस्थिती भीषण होती, पेशव्यांच्या काळात पेरले गेलेल्या जातीयतेच्या भिंती अधिक मजबूत होत्या. अस्पृश्य मागासवर्गीय लोकांना, स्वतःला उच्चवर्णीय समजणारे धर्मांध लोक अतिशय तुच्छतेने वागवत असत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासही बंदी होती. अस्पृश्याना राहायला गावाकुसाबाहेर जागा होत्या. त्यांना गावात राहायची परवानगी नव्हती. त्यांच्याकडे कुणी जेवण सोडा पाणीही पीत नसे, त्यांचा स्पर्श सुद्धा अशुभ मानला जायचा. असली भीषण सामाजिक परिस्थिती पाहुन शाहू महाराज व्यथित झाले. स्वराज्यातील याच कष्टकरी, श्रमकारी, शेतकरी व बहुजन वर्गाचे दुःख निवारण्यासाठी आपले आयुष्य खर्ची करण्याचा संकल्प छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी केला. सनातन्यांनी, कर्मठाणी हिनवलेल्या गरीब अस्पृश्य लोकांना छत्रपतींनी आपलंसं करायला सुरुवात केली. माझ्या राज्यात अस्पृश्य हा शब्दच असता कामा नये असं म्हणत त्यांनी समाजसुधारनेचा पाया रचायला सुरुवात केली. जातीयता नष्ट व्हाही यासाठी ते मुद्दामहून अस्पृश्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्याबरोबर जेवण करू लागले. एवढेच नाही तर छत्रपतींनी त्यांच्या राजवाड्यावर अस्पृश्यांसाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रमही ठेवला होता व स्वतः शाहू महाराजांनी त्यांच्याबरोबर जेवण केलं होत. बहिषकृत्तांना समाज पुरस्कृत करण्यासाठी उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल होतं. पेशवाईच्या काळात फोफावलेल्या जातीयतेवर शाहुंनी प्रहार केला होता. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी शाहू महाराज आहोरात्र कष्टत होते. शाहू महाराज हे फक्त बोलके सुधारक नव्हते ते कृतिशील सुधारक होते.
त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या गंगाराम कांबळे नावाचा व्यक्तीला त्यांनी कोल्हापूरमध्ये चहाचे हॉटेल सुरु करून दिले होते. डोक्यात जातीयतेची हवा गेलेली माणसं इथं चहा पिणार नाहीत अशी शंका महाराजांना आली म्हणून या हॉटेलला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शाहू महाराज रोज सकाळी आपल्या सहकाऱ्यांबरोबर इथं चहा पिण्यासाठी येऊ लागले. आपले महाराज या हॉटेलमध्ये चहा पीत आहेत हे पाहिल्यानंतर सामान्य लोक सुद्धा या हॉटेल मध्ये येऊ लागले. अशाप्रकारे लोक जातपात विसरून एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येऊ लागले. सनातनी वर्ण व्यवस्थेने अनेक जातींना उपेक्षित ठेवून त्यांचा शिक्षणाचा, सत्तेचा अधिकार नाकारला होता. सामाजिक अवहेलना झाल्यामुळे अशा कित्येक जाती प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेल्या होत्या. काही कुटुंबानी गुलामगिरी स्वीकारली होती. पोटासाठी गुलामगिरीत धन्यता मानून कित्येत जाती फक्त जगत होत्या दोन वेळच्या अन्नासाठी. कुटुंब चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने इतर काही जमाती चोऱ्या, दरोडे टाकत असत, त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. यामध्ये प्रामुख्याने रामोशी, पारधी समाज होता. त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला होता. आपल्या राज्यता समता प्रस्थापित व्हावी या साठी शाहू महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली व आपली कारकीर्द पणाला लावून गुन्हेगार ठरवलेल्या या जातींवरचे निर्बंध उठवले. त्यांची हजेरी पद्धत बंद केली. त्यांना सैन्याचे प्रशिक्षण देऊन आपल्या संस्थानामध्ये रखवालदाराच्या नोकऱ्या दिल्या. गुन्हेगार ठरवले गेलेल्या समाजाला गुन्हेगारीपासून परावृत्त करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सामाजिक बांधिलकी जपणारे शाहू महाराज हे मानवतावादी राजे होऊन गेले.
एवढंच नाही तर काही इतर विशिष्ट जाती पोटा साठी गावोगावी भटकंती करून जगत असतं. एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन पालं टाकून राहत असतं आणि हाताला मिळेलं ते काम करून ती माणसं आयष्यभर भटकंतीच जिणं जगत होती. अशा लोकांना शाहू महाराजांनी संस्थानामध्ये जागा देऊन पक्की घरं बांधून दिली व कुटुंबातील सदस्यांना संस्थानामध्ये नोकऱ्या देऊन त्यांच्या रोजगाराची सोय केली. त्यामुळे पोटासाठी गावोगावी वनवन भटकणाऱ्या लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे काम शाहू महाराज करीत होते. सामाजिक परिवर्तनाचे काम करणाऱ्या छत्रपतींना सुद्धा उच्चवर्निंयांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते, एवढी भक्कम वर्णव्यवस्था जातीव्यवस्था सनातनन्यांनी निर्माण केली होती. पण शाहू महाराज हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते ते त्यांच्या कार्यापासून यतकिंचितही विचलित झाले नाहीत. उलट वेदोक्त प्रकरणावरून त्यांनी सनातनी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते. होते.
सामाजिक मागासलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना संस्थांनातील नोकऱ्यांबरोबर त्यांच्या भविष्यातील पिढीसाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेची होती. त्यासाठी सक्तीचे शिक्षण आणि आरक्षण दिल्यास समाजातील दरी मिटण्यास मदत होईल अशी शाहू महाराजांची खात्री होती. म्हणून त्यांनी राज्यात
शिक्षणाचा प्रसार केला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. त्यावेळी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे करणारे देशातले एकमेव राजे होते शाहू छत्रपती. त्यांनी गावागावात शाळा काढल्या. विविध ठिकाणी शैक्षणिक संस्थां उभारल्या.
जे पालक मुला-मुलींना शाळेत पाठविणार नाहीत त्यांच्या कडून दंड आकारण्याचे आदेश दिले. बहुजनांनी समाजात सन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाची कास धरुण स्वावलंबी बनाव, मग स्वावलंबी बनलेली मस्तक कुणापुढे नतमस्तक होऊन गुलामगिरी करणार नाहीत. अशा प्रकारचा स्वाभिमान प्रजाजनांमध्ये निर्माण करण्यात शाहु महाराज यशस्वी झाले होते. पण त्याकाळी दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न समोर असलेल्या बहुजनांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवून खर्च करणे शक्य नव्हते याची जाण शाहू महाराजांना होती. त्यासाठी त्यांनी विविध जाती धर्मातील मुलांसाठी बोर्डिंग उभारली. मराठा बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग लिंगायत बोर्डिंग अशा अनेक बोर्डिंग ची स्थापना त्यांनी कोल्हापुरात केली. शाहू महाराजांनी कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक, चेन्नई इत्यादी ठिकाणी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेतला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाहू महाराजांना आदर वाटत असे. म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वोतपरी मदत केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रदेशातून शिक्षण घेऊन मुंबईमध्ये आले होते हे जेव्हा शाहू महाराजांना कळले तेंव्हा त्यांनी स्वतः बाबासाहेबांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. विद्वत्तेचा आदर करणारे महान शिक्षण प्रेमी होते शाहू महाराज. जानेवारी 1920 मध्ये बाबासाहेबांनी प्रकाशित केलेलं *मूकनायक* हे पाक्षिक बहुजनाच्या, सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत होते. पण नंतर आर्थिक करणास्तव हे बंद पडल्याचे समजताच शाहू महाराजांनी मदत करून हे पाक्षिक पुन्हा चालू करण्यास प्रोत्साहन दिले होते
संपुर्ण देशभर अस्पृश्यउद्धाराच्या नव्या पर्वाची सुरवात करणारी देशातील पहिली अस्पृश्य परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे शाहू महाराजांच्या पुढाकाराणे भरली होती.
या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरील फेटा बाबासाहेबांना घालून त्यांचा विशेष सन्मान केला होता. तेंव्हा शाहु महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशाचे नेते असे संबोधले होते. देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची चुणूक लागलेली दोन माणसे होते. पहिले शाहू महाराज आणि दुसरे म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड. या दोघांनीही आंबेडकरांना मदत करून त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले होते.
पुढे कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणी पुतळा उभारला होता. बहुजनांना, अस्पृश्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाबरोबर दुसरा उपाय म्हणजे आरक्षण. 6 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्याचबरोबर सामाजिक ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवण्याचे आदेश संस्थानामध्ये काढले व पिढ्यानपिढ्या पिचल्या गेलेल्या लोकांच्या ओंजळ आरक्षणरूपी प्रेमान भरली होती. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला गेलेल्या काळात, माणुसकी जिवंत असलेल्या राजान, बहूजनांच्या आयुष्यात सोन्याचा दिवस उजाडला होता. अशा महान राजाची जयंती एका सणासारखी साजरी करण्याचे आव्हाहन डॉ. बाबासाहेबानी बहुजनांना केले होते.
या लोककल्याणकारी राजाविषयी कृतज्ज्ञता व्यक्त करताना माझ्या लेखणीतून अवतारलेल्या ओळी,
गरिबांसाठी पसरल्या बाहू
रयतेचे राजे छत्रपती शाहू
स्वतःच्या मुलीच्या लग्नात स्वागताला उभे केले महार मांग
बहुजनांच्या राजाने फेडले माणुसकीचे पांग
गंगाराम कांबळे चा हातचा रोज पिला चहा
समतेचा राजा कसा असतो पहा
न्यायाचा आधार प्रेमाचा वाहू
रयतेचे राजे राजर्षी शाहू
जातीपातीच्या उतरंडीला लावला सुरंग
बहुजनांच्या आयुष्यात आरक्षणाने पेरले जगण्याचे रंग
अस्पृश्यांच्या घरात बसून खाल्ली छत्रपतींनी भाकर
सामाजिक लोकशाहीचे बनले चाकर
बंधूतेच्या पुजाऱ्याला हृदय मंदिरात पाहू
महाराजांचे महाराज छत्रपती शाहू
वेदोक्तातील पुरोहितान विरोधात पुकारले बंड
सत्यशोधक चळवळीसाठी थोपटले दंड
सक्तीच्या प्राथमिक शिक्षणान रचला विकासाचा पाया
सामाजिक लोकशाहीच्या अधिकारांनी बदलली समाजाची काया
चला मानवतावादी राजाचे गोडवे गाऊ
लोकशाहीचे शिल्पकार राजर्षी शाहू
राजर्षी शाहू महाराज हे सुधारणावादी राज्यकर्ते होते, उद्योगधंद्याना प्रेरणा देणारे राजे होते. आधुनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या राज्यामध्ये शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. शेतीबरोबर जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले, विविध सहकारी संस्थांची स्थापना केली. शेतकऱ्यांना अत्यल्प व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले.
त्यांनी कोल्हापुरात शाहू छत्रपती स्पिनिंग अँड व्हिविंग मिल ची स्थापना केली. तसेच गुळ निर्मिती व बाजारपेठ, शाहूपुरी व्यापार पेठ स्थापन केली. शेतीमध्ये संशोधनासाठी कोल्हापुरात किंग एडवर्ड एग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा मिटवला.
शाहू महाराजांच्या काळात आपल्या धर्मव्यवस्थेने स्त्रियांना नेहमी दुय्यम दर्जा दिला होता. त्यांना उपेक्षित ठेवले होते त्यांचे हक्क, स्वतंत्र नाकारले होते. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेलं परिवर्तनाचे कार्य समर्थपणे शाहू महाराजांनी पुढे चालवले. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. त्यांच्या संस्थानामध्ये आंतरजातीय आंतरधर्म विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.
छत्रपतींनी आंतरजातीय विवाह ची सुरुवात स्वतःच्या घरातून केली. आपली बहीण चंद्रप्रभादेवी यांचा विवाह इंदोरच्या यशवंतराव होळकर यांच्याबरोबर निश्चित केला. अशाप्रकारे त्यांनी 25 ते 30 आंतरजातीय विवाह लावून दिले.
विधवाविवाहाच्या, अंतर जातीय विवाहाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
शाहू महाराज हे कलेचे आश्रयदाते होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शाहू महाराजांनीही त्यांच्या कळात कलावंतांना प्रोत्साहन दिले होते. लोक कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलाकारांना त्यांनी राजश्रय मिळवून दिला. शाहू महाराजांना कुस्तीची प्रचंड आवड होती. ते स्वतः एक उत्तम मल्ल होते. त्यांनी मोठं मोठ्या कुस्त्या केल्या होत्या. कोल्हापूर संस्थानातही त्यांनी कुस्ती जपली होती जगवली होती. कित्येक पैलवानाना ते मदत करीत असतं. छत्रपती शाहू महाराज युरोपच्या दौऱ्यावर असताना तेथे त्यांनी रोम शहरामधील प्रसिद्ध असे कोलोसीयम मैदान पहिले. त्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीसाठी मैदान बांधायचे ठरवले आणि शाहू महाराजांनी त्याकाळी भारतातील एकमेव असे साठ हजार प्रेक्षक बसतील असे भव्यदिव्य *खासबाग मैदान* उभारले. यांच मैदानावर अनेक अंतरराष्ट्रीय किर्तीवंत मल्लंच्या कुस्त्या देशाने पहिल्या आहेत. त्यानंतर कोल्हापूर हे खऱ्या अर्थाने कुस्तीचे माहेरघर बनले. कुस्तीमध्ये भारताला ऑलिम्पिक मध्ये पाहिलं पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांनीही या मैदानावर अनेक कुस्त्या केल्या. खाशाबा जाधव यांना ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी छत्रपती घराण्यानाने आर्थिक मदतही केली होती. अश्याप्रकारे शाहू महाराजांनी क्रीडा क्षेत्राला न्याय देण्याच महान कार्य केलं आहे.
त्याकाळी शाहू महाराजांच्या काळात अठरापागड जाती बारा बलुतेदार आनंदाने राहत होते. त्यांना एकमेकांनविषयी प्रेम आदर होता. आज आपण महापुरुषांच्या विचारांच आकलन केलं पाहिजे. आज मराठा,धनगर किंवा इतर जाती एकमेकांच्या विरोधक नाहीत हे आपण जाणलं पाहिजे. राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोक मुद्दामहून जाती जातीमध्ये विष पेरण्याचे काम करीत आहेत. आपण यांच्या राजकीय स्वार्थाला बळी न पडता समतावादी राजश्री शाहूंच्या विचारांचा पारायण केलं पाहिजे. छत्रपतींचा वारसदार म्हणून शाहूनी महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत दिलेलं योगदान अतुलनीय आहे. कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या कल्यानासाठी नाही तर अखंड मानवजातीच्या विकासासाठी, हक्कासाठी शाहू महाराजांनी योगदान दिलं आहे. एक वेळ माझ्या संस्थानातील खजिनारीता झाला तरी चालेल पण माझ्या राज्यातला एकही जण उपाशी झोपता कामा नये असा उदात्त विचार कृतीतून मांडणारा लोकराजा 6 मे 1922 रोजी अनंतात विलीन झाला.
मानव जातीच्या सामाजिक न्यायासाठी आहोरात्र झाटणारे महाराजांचे महाराज छत्रपती शाहू महाराज व त्यांचे विचार हे आजच्या पिढीसाठी जिवन जगत असताना संघर्षाच्या वाटेवरील प्रेरणाचे झरे आहेत..
✒️विक्रमसिंह मगर
(लेखक हे प्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक आहेत)
9970027070