
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : वाघोली येथील बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेल्या स्वछतागृहाला चालू करण्यासाठी महानगरपालिका कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत असा संतापजनक सवाल प्रवाशांनी केला आहे. रोज या स्थानकातून लाखो प्रवाशी प्रवास करत आहेत. यात महिला, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांची रोज रेलचेल या बस स्थानकावर पहायला मिळते, रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असलेले हे वाघोली बस स्थानक मात्र मूलभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे.या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेले स्वछतागृह अजूनही प्रवाशांसाठी खुले करण्यात न आल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या बाजूला दुसरे एक स्वछतागृह वापरासाठी आहे पण ते असून नसल्यासारखे आहे इतकी दयनीय अवस्था त्या शौचालयाची झालेली आहे त्यामुळे विशेषतः महिला आणि युवतींचे प्रचंड हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला आणि युवतींसाठी ही परिस्थिती अत्यंत असुरक्षित आणि असुविधाजनक आहे.
प्रवाशांचा संताप
वाघोली बस स्थानकावर सुविधांचा अभाव असल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप आहे. महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नव्याने बांधण्यात आलेले स्वछतागृह प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रश्न हा आहे की, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेकडून प्रत्यक्ष कृती कधी होणार?
सदर शौचालय महानगरपालिकेने बांधले असून त्याची देखभाल दुरुस्तीची कामेही महानगरपालिका करणार आहे, त्यामुळे ते सुरु कधी होणार आहे हे निश्चित सांगता येणार नाही.
– सोमनाथ रामचंद्र वाघोले डेपो मॅनेजर, वाघोली, पुणे.