
मनसे नेत्याचे मोठं विधान…
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार याची चर्चा आहे. याविषयी राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता आहे. त्यात आता मनसेचे पदाधिकारी ही पुढे येऊन विधाने करू लागली आहेत.
मनसे आणि शिवसेना येत्या सात जुलैला मराठी भाषेबाबत राज्य शासनाविरुद्ध मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा झेंडा नसलेला आणि सर्वपक्षीय असेल. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय या निमित्ताने राजकीयदृष्ट्या पुढे आला आहे.
यासंदर्भात मनसे कार्यालयात मोर्चाच्या तयारीची बैठक झाली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी यावेळी अतिशय धाडसी विधान केले. येत्या काही दिवसातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले दिसतील असा दावा त्यांनी केला.
दिनकर पाटील म्हणाले, राज्यात सत्तेत आल्यावर महायुती सरकार आणि त्यांच्या घटक पक्षांनी उच्छाद मांडला आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांची हे टाळणी केली जात आहे. राजकीय विरोधकांचा छळ करून दडपशाहीचे राज्य सुरू आहे. त्याला जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याने या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे काम महायुती करीत आहेत. कोणतेही राजकीय आणि सांस्कृतिक धोरण नसताना गुन्हेगारांनाही पोचण्याचे काम भाजप करीत आहे. त्याचे उघडपणे समर्थन मुख्यमंत्री आणि महायुतीचे मंत्री करताना दिसतात. शेतकरी आणि महिलांना आम्ही पैसे देतो. त्यावर ते जगतात, अशी हे टाळण्याची भाषा महायुतीचे नेते जाहीरपणे करू लागले आहे.
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीला उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र यावे ही सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या अपेक्षेचा भंग हे दोन्ही नेते करणार नाहीत. दोन्ही नेत्यांना महायुतीच्या सरकारने विविध प्रकारे छळण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर देण्याची वेळ आता आली आहे, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीची फक्त आगामी महापालिका निवडणुकीतच नव्हे तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत धुळधाण होईल. ग्रामपंचायत ते विधानसभा फक्त ठाकरेंचा भगवाच फडकेल, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
दिनकर पाटील हे पूर्वश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भाजपचे महापालिका सभागृह नेते असलेल्या पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी पश्चिम मतदार संघातून उमेदवारी करीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यामुळे दिनकर पाटील यांचा दावा चर्चेचा विषय ठरला आहे.