
उद्धव ठाकरेंनी ‘या’ शिलेदाराकडे सोपवली नाशिक महानगरप्रमुखपदाची धुरा !
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहेत. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर काल शुक्रवारी (दि. 27) नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. विलास शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत संकेत देताच त्यांना तडकाफडकी महानगरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे.
विलास शिंदे यांना हटवत मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत महानगरप्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली आहे. नाशिक महानगर प्रमुख पदी मामा राजवाडे यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार : मामा राजवाडे
शिवसेना ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख नियुक्ती होताच मामा राजवाडे म्हणाले की, पक्षाने माझे ग्राऊंडवरील काम पाहून माझ्यावर जबाबदारी दिली. पक्ष सोडून जाणारे स्वार्थापोटी पक्ष सोडत आहे. कोणताही पक्ष संपत नसतो. पक्षातील नाराजांची नाराजी मी नक्की दूर करेन. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहे. नाशिक महापालिकेवर मशाल हाती घेऊन भगवा फडकवणार आहे, असे त्यांनी म्हटले.
बबनराव घोलप, सुधाकर बडगुजरांवर निशाणा
मामा राजवाडे पुढे म्हणाले की, पक्ष सोडणारे मलिदा खाण्यासाठी सत्तेत जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांना मंत्रिपद, त्यांच्या मुलांना आमदारकी आणि महापालिकेत संधी दिली, असे म्हणत त्यांनी बबनराव घोलप आणि सुधाकर बडगुजर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. मला कोणतेही आव्हान नाही, शिवसैनिकांच्या जोरावर काम सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.