उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी काल २७ जून रोजी हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असून एकच मोर्चा निघणार असल्याचे ट्वीट केले. या मोर्चाची तारीखही त्यांनी जाहीर केली.
५ जुलैला ठाकरे बंधू एकत्रित येत हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यांचे एका मुद्यावर म्हणजेच हिंदी सक्तीकरणाच्या मुद्यावर एकत्र येण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे या मोर्चाला विरोध करणार नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे. ज्यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश स्वीकारला तेच आता मोर्चा काढत आहेत. असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेता त्यांना लगावला आहे.
या राज्यात मराठी भाषा ही शिकायलाच लागेल मात्र हिंदीसाठी कुणीही सक्ती करणार नाही. उलट तीन भाषा शिकणे अनिवार्य करणाऱ्या अध्यादेशातील अनिवार्य हा शब्द वगळून आम्ही नवा अध्यादेश काढला आह, असे शिंदे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशेनुसार शिक्षणमंत्री सर्व घटकांशी संवाद साधत असून सर्वमान्य असाच तोडगा काढण्यात येईल, असे देखील शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत विराट मोर्चा निघणार आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या अगदी तोंडावर ठाकरे बंधू या मुद्यावर एकत्र आल्याने सगळ्यांचे लक्ष आता या मोर्चाकडे लागले आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे मात्र इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली आहे. शिंदेसेनेच्या शिलेदारांकडून उद्धव ठाकरे यांना माशेलकर समितीचा हवाला देत टार्गेट केले जात आहे. तसेच आता उद्धव राज एकत्रित हिंदी सक्तीविरोधातील मोर्चावर एकच मोर्चा काढणार असल्याने भाजपकडून पडद्याआड या मोर्चाला उत्तर देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.