
काँटा लगा गर्ल’ने कार्डिअक अरेस्टमुळे गमावला जीव…
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. 27 जून रोजी रात्री या अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे.
अभिनेत्रीचे निधन कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याची माहिती रुग्णालयातील रेसिप्शनिस्टकडून समोर आली.
मीडिया रिपोर्टनुसार शेफालीला तातडीने मुंबईमधील Bellevue Multispeciality Hospital याठिकाणी दाखल करण्यात आलेले. यावेळी तिच्यासह तिचा पती पराग त्यागी आणि इतर तिघेजण उपस्थित होते. तातडीने वैद्यकीय मदत मिळूनही तिला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टने या दुर्दैवी बातमीला दुजोरा दिला आहे.
‘काँटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शेफालीच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरुन गेले आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ही बातमी पसरताच सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. अद्याप तिच्या निधनाविषयी अधिक माहिती आणि कुटुंबाकडून अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.
पत्रकार विकी लालवानी यांनी पोस्ट शेअर करत या घटनेविषयी तपशील शेअर केला आहे. त्यांनी असे लिहिले की, मी या वृत्तास दुजोरा देतो की, ही पोस्ट शेअर करण्याच्या 45 मिनिटांपूर्वी तिला बेलव्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (अंधेरीतील स्टार बाजारसमोर) दाखल करण्यात आले, त्याआधीच तिचे निधन झाले होते. शेफालीला तिचा नवरा आणि इतर तिघेजण रुग्णालयात घेऊन आले होते. ही बातमी त्याठिकाणी रिसेप्शनवर असणाऱ्या स्टाफने या बातमीला दुजोरा दिला, ज्यांनी असे म्हटले की- ‘शेफालीचे रुग्णालयामध्ये आणण्यापूर्वीच निधन झाले होते. तिचा नवरा आणि इतर काहीजण तिचा मृतदेह घेऊन आले होते.’ आम्ही आरएमओशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘अधिक माहितीसाठी कृपया डॉ. विजय लुल्ला (हृदयरोगतज्ज्ञ) यांच्याशी बोला.’ डॉ. लुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे वृत्त नाकारले नाही. त्यांनी एवढेच म्हटले की, ‘मी कोणत्याही रुग्णाबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही.
या पोस्टमध्ये विकी लालवानी यांनी पुढे लिहिले आहे की, त्यानंतर आम्ही त्याच रुग्णालयातील डॉक्टर सुशांतशी बोललो, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि म्हणाले, ‘आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवत आहोत’.” अभिनेत्रीच्या निधनानंतर राजीव अदातिया, अली गोनी आणि इतरही काही सेलिब्रिटींनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘काँटा लगा’ गाण्याने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. 1964 साली आलेल्या ‘समझोता’ चित्रपटातील गाण्याचे हे रिक्रिएटेड व्हर्जन होते. 2002 साली रिलीज झालेले ‘काँटा लगा’चे रिक्रिएटेड व्हर्जन डीजे डॉलने केले होते आणि हे गाणे टी-सीरीजने रिलीज केले होते.
शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी झाला होता. तिच्या वडिलांचे नाव सतीश जरीवाला आणि आईचे नाव सुनीता जरीवाला आहे. 2014 साली तिने टीव्ही मालिका अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.