
दैनिक चालु वार्ता चंदगड कोल्हापूर प्रतिनीधी -संदिप कांबळे
चंदगड/ प्रतिनिधी: चंदगड तालुक्यातील पार्ले सब-स्टेशन येथील कळसगादे पंचक्रोशीतील जवळपास सर्वच गावे मुसळधार पाऊस व तुफानी वाऱ्यांमुळे विद्युत पोल पडल्यामुळे मंगळवार पासून अंधारात होती. गेले चार- पाच दिवस जराही उसंत न घेता अहोरात्र, मुसळधार पावसात व पुराच्या वाहत्या पाण्यात उभं राहून महावितरणचे कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत होते व जनसामान्यांचे लाईटवाचून होणारे हाल त्यांनी थांबवले. या युद्धपातळीवर वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र चंदगड तालुक्यात कौतुक होतं असताना दिसून येत आहे….
दररोज प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस करणारे महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना प्राणाची बाजी लावत लढवय्याप्रमाणे आपले काम करत होते. महावितरणचे कर्मचारी दररोज वीजरूपी अक्राळ विक्राळ शत्रूचा सामना शूर लढवय्याप्रमाणे करत असतात. त्यातल्या त्यात पावसाळा म्हणजे वीज कर्मचार्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरुन त्यात त्यांना प्राण गमवावा लागतो किंवा कायमस्वरुपी अपंगत्वही येऊ शकते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करुन महावितरण कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पडावे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजवितरण यंत्रणेत अनेक बिघाड उद्भवतात, याचा राग ग्राहकांकडून वीज कर्मचार्यांवर काढला जातो. मात्र वीज जाण्यामागील कारणांचा विचारही कुणी करत नाही. रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित होतो आणि काही वेळेनंतर तो परत सुरळीत होतो. एकीकडे सर्वत्र आधुनिकीकरणाच्या दिशेने काम सुरू असले तरी उघड्या वीजवाहिन्यांची यंत्रणा सुरू अथवा बंद करण्यासाठी आजही मनुष्यबळाची गरज आहे.
या कामात कार्यक्षम कार्यकारी अभियंता संजय पोवार, उपकार्यकारी अभियंता अजित पोवार, सहाय्यक अभियंता विठ्ठल चौगुले, नारायण दळवी, अमोल दळवी, ओमप्रकाश पटेल, राहुल कांबळे, प्रदीप वंजारे, गुरुप्रसाद मोरे, अमित गावडे, प्रदीप तोरस्कर, दीपक गावडे आणि त्यांच्या टीमने प्रचंड कष्ट घेतले. खाजगी कंत्राटदारांचे कर्मचारी हि उपस्थित होते तसेच कोदाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे यांचे हि सहकार्य लाभले…
————————————————————————
वीज कर्मचार्यांना सहकार्य करणे गरजेचे
अनेकदा वीज आली नाही म्हणून ग्राहक संतापतात, वीज कर्मचार्यांवर राग काढतात. उपरोक्तसर्व गोष्टी विचारात घेता सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करुन महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावत असतात. यात त्यांना प्राण गमवावा लागतो किंवा कायमस्वरुपी अपंगत्वही येऊ शकते. तेव्हा त्यांना समजून घ्यावे, वीज कर्मचार्यांवर दोषारोप करणे टाळावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
—————————————-