
सीक्रेट आलं समोर…
तुमच्यापैकी अनेकजण कष्टाने कमवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याची संधी शोधत असतात. काहीजण शेअर बाजारात गुंतवणूक करतात, तर काहीजन म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात. अनेकजण सोने खरेदी करतात, तर काहीजण संपत्ती खरेदी करतात.
मात्र आपल्या देशातील श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.
भारतातील श्रीमंत लोक अशा ठिकाणी गुंतवणूक करतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. श्रीमंत लोकांचे लक्ष आता फक्त शेअर बाजार, सोने किंवा रिअल इस्टेटवर नाही तर इतरही ठिकाणी असते. अनेकजण खाजगी इक्विटी (कंपन्या, ज्या शेअर बाजारात लिस्टेड नाहीत), परदेशी स्टार्टअप्स आणि एआयएफ सारख्या जास्त परतावा देणाऱ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात.
AIFs म्हणजे काय?
AIFs (Alternative Investment Funds) म्हणजेच पर्यायी गुंतवणूक निधी. हे विशेष प्रकारचे गुंतवणूक फंड आहेत, जे स्टार्टअप्स, इंफ्रास्ट्रक्चर, आरोग्य तंत्रज्ञान या नवीन क्षेत्रात पैसे गुंतवतात. 2024 पर्यंत एआयएफमध्ये 11.35 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.
परदेशातही मोठी गुंतवणूक केली जाते
श्रीमंत लोक केवळ भारतात नव्हे तर अमेरिका, युरोप आणि आशियातील कंपन्या, स्टार्टअप्स आणि हेज फंडांमध्येही पैसे गुंतवत आहेत. महत्वाची बाब म्हणजे भारत सरकारने परदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम शिथिल केले आहेत, त्यामुळे परदेशातील गुंतवणूक आणखी वाढली आहे.
रिअल इस्टेट आणि स्टार्टअप्सवर नजर
मिळालेल्या माहितीनुसार देशातील अतिश्रीमंत लोक आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी 32% रक्कम शेअर बाजारात, 29% रिअल इस्टेटमध्ये आणि 18% रक्कम खाजगी कंपन्या, AIFs आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवतात. सध्या हेल्थटेक, ग्रीन एनर्जी आणि फिनटेक या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढली आहे.
गुंतवणूक पद्धत का बदलली?
याआधी लोक एफडी किंवा सोन्यात गुंतवणूक करत असत. मात्र यातून मर्यादित परतावा मिळतो. मात्र खाजगी इक्विटी आणि परदेशातील गुंतवणूक जास्त नफा देते. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि देशांमध्ये पैसे गुंतवून जोखीम कमी करता येते. त्यामुळे गुंतवणूक पद्धत का बदलली आहे.